मुंबई प्रतिनिधी
भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषकावर आपलं नाव कोरत इतिहास रचला आणि देशाचा मान उंचावला. या ऐतिहासिक विजयाच्या निमित्तानं महाराष्ट्र सरकारकडून संघातील राज्यातील तीन तारे, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांचा आज (शुक्रवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.
दक्षिण मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आयोजित या विशेष कार्यक्रमात फडणवीस यांनी तिन्ही खेळाडूंना प्रत्येकी सव्वादोन कोटी रुपयांचं रोख पारितोषिक देऊन “महाराष्ट्राचा अभिमान” असा गौरव केला. यावेळी वातावरण टाळ्यांच्या गजरात दुमदुमलं.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “भारतीय महिला संघाच्या विश्वविजयानं देशातील प्रत्येक तरुणीला नवसंजीवनी दिली आहे. हा विजय केवळ खेळातील नाही, तर आत्मविश्वास आणि जिद्दीचं प्रतीक आहे. आज जगाने पाहिलं की, ज्या देशांनी पारंपरिकरीत्या विश्वचषकावर वर्चस्व ठेवलं, त्यांच्याकडून भारताने तो हिरावून घेतला.”
त्यांनी पुढे सांगितलं की, महाराष्ट्र सरकारकडून संघाचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांना साडेबावीस लाख रुपये, तर सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याला अकरा लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं आहे.
स्मृती मानधना यांनी सन्मानाबद्दल राज्याचे आभार मानताना सांगितलं, “मुंबईत सन्मान मिळणं आमच्यासाठी अत्यंत खास क्षण आहे. महाराष्ट्राने नेहमीच आमचं मनोबल वाढवलं आहे. २०१७ मध्ये आम्ही उपविजेते झालो तेव्हाही राज्याने पाठिंबा दिला होता. हा विश्वविजय आमच्या प्रशिक्षक आणि संपूर्ण सपोर्ट टीमशिवाय शक्य नव्हता.”
तर प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी खेळाडूंच्या मेहनतीचं कौतुक करताना सांगितलं, “मुंबईत पाऊल ठेवताना आम्हाला विश्वास होता की काहीतरी ऐतिहासिक घडणार आहे. या खेळाडूंनी दिवसरात्र कष्ट करून भारतासाठी विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न साकार केलं.”
या कार्यक्रमाला क्रीडा अधिकारी, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधी आणि क्रीडा प्रेमी उपस्थित होते.
महाराष्ट्र सरकारकडून झालेल्या या सत्कारानं महिला क्रिकेटपटूंचा आत्मविश्वास अधिक दुणावला असून राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.


