मुंबई प्रतिनिधी
जगप्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या मालकीची स्टारलिंक (Starlink) कंपनी अखेर भारतात दाखल झाली असून, तिचा पहिला करार महाराष्ट्र सरकारसोबत झाला आहे. उपग्रहाधारित इंटरनेट सेवा राज्याच्या अगदी दुर्गम गावांपर्यंत पोहोचवण्याच्या या भागीदारीमुळे डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने राज्याने एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी स्टारलिंकच्या उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयर आणि महाराष्ट्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह यांनी आशयपत्रावर (Letter of Intent – LOI) स्वाक्षरी केली. यानंतर महाराष्ट्र हे भारतातील असे पहिले राज्य ठरले आहे, ज्याने सरकारी संस्था, ग्रामीण भाग आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी उपग्रहाधारित इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी स्टारलिंकसोबत औपचारिक करार केला आहे.
• “डिजिटल दरी भरून काढणार”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
> “स्टारलिंकच्या सहकार्यामुळे महाराष्ट्र आता ‘डिजिटल दरी’ मिटवण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकत आहे. आता प्रत्येक गाव, शाळा, आरोग्य केंद्र उेकितीही दुर्गम असो, इंटरनेटशी जोडले जाणार आहे. हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने ‘फ्युचर-रेडी’ (Future Ready) बनवण्याचा आमचा निर्धार आहे.”
• काय होणार फायदे?
स्टारलिंकच्या लो-अर्थ ऑर्बिट (Low-Earth Orbit) उपग्रहांमुळे राज्यातील दुर्गम भागांनाही हाय-स्पीड इंटरनेटचा लाभ मिळणार आहे.
• गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव, वाशिम यांसारख्या आकांक्षी जिल्ह्यांना थेट फायदा होईल.
• आदिवासी शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHCs) इंटरनेटशी जोडली जातील.
• वन चौक्या, तटीय पोलीस नेटवर्क आणि आपत्ती नियंत्रण कक्षांसाठी सक्षम संपर्क व्यवस्था उभी राहील.
तटीय भागांतील फेरी सेवा, बंदरे आणि समृद्धी महामार्गालाही स्मार्ट कनेक्टिव्हिटी मिळेल.
• शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात नवा अध्याय
या करारामुळे ऑनलाइन शिक्षण (E-Learning) आणि टेलिमेडिसिन (Telemedicine) सेवा अधिक परिणामकारक होतील.
डॉक्टर आणि रुग्णांमधील थेट संपर्क शक्य होईल, तसेच विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे ऑनलाइन वर्ग मिळतील.श
• 90 दिवसांचा पायलट प्रकल्प
या उपक्रमासाठी महाराष्ट्र सरकार आणि स्टारलिंकचा एक संयुक्त कार्यगट (Joint Working Group) स्थापन करण्यात आला आहे.
हा गट 90 दिवसांच्या पायलट प्रकल्पावर काम करणार असून, 30, 60 आणि 90 दिवसांच्या टप्प्यांनुसार प्रगतीचा आढावा घेतला जाईल.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तिमाही आढावा घेतला जाणार आहे.
• स्टारलिंकची प्रतिक्रिया
स्टारलिंकच्या उपाध्यक्षा लॉरेन ड्रेयर म्हणाल्या,
“जिथे पारंपरिक इंटरनेट पोहोचू शकले नाही, तिथे पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. महाराष्ट्र सरकारसोबतचा हा उपक्रम आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. समावेशक आणि लवचिक डिजिटल विकासाच्या दिशेने हे भागीदारीचे पाऊल ऐतिहासिक ठरेल.”
पायलट टप्प्यातील प्रमुख उद्दिष्टे
• आदिवासी शाळा, ‘आपले सरकार’ केंद्रे आणि आरोग्य केंद्रांना जोडणे
• ळआपत्कालीन संपर्क आणि तटीय पाळत वाढवणे
• शिक्षण व आरोग्य सेवांमध्ये हाय-स्पीड कनेक्टिव्हिटीचा वापर
• स्थानिक एजन्सींसाठी प्रशिक्षण आणि क्षमता वाढ कार्यक्रम
स्टारलिंकचा हा प्रवेश केवळ इंटरनेटसाठीच नाही, तर महाराष्ट्राच्या डिजिटल क्रांतीचा नवा अध्याय ठरणार आहे.
गाव-खेड्यांपासून तटीय भागांपर्यंत, ‘डिजिटल महाराष्ट्र’ या संकल्पनेला आता उपग्रहांचा वेग मिळणार आहे!


