जालना प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर नावाच्या फलकाखाली लघुशंका केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटीझन्सकडून झालेल्या तीव्र ट्रोलिंग आणि धमक्यांना कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील ढोकमळ तांडा येथे घडली आहे. महेश आडे (वय 28) असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणामुळे सोशल मीडियावरील गैरजबाबदार ट्रोल संस्कृतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वी दोन तरुण छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाजवळील पिवळ्या फलकाखाली लघुशंका करताना दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये दोन्ही तरुण नशेत असल्याचे दिसून येत होते. या घटनेनंतर सामाजिक माध्यमांवर संताप व्यक्त होत असताना, संबंधित तरुणांनी दुसऱ्या दिवशी माफीचा व्हिडिओ प्रसिद्ध करत आपली चूक कबूल केली होती.
तथापि, माफीनाम्यानंतरही सोशल मीडियावरील धमक्या थांबल्या नाहीत. अनेक इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा व्हायरल करण्यात येत होता. या पोस्ट्समध्ये शिवसेना (शिंदे गट) छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्याही अकाउंटचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सातत्याने मिळणाऱ्या धमक्यांमुळे मानसिक ताणाखाली आलेल्या महेश आडे याने “हे आता सहन होत नाही” असं सांगत विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व नातेवाईकांनी संताप व्यक्त करत व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर आणि धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या घटनेमुळे “ट्रोलिंग” आणि “सोशल मीडियावरील न्यायालयीन संस्कृती”चा बळी ठरणाऱ्या तरुणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


