मुंबई प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत. गृहविभागाने मंगळवारी चार सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्यांसह विविध आयुक्तालयांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची अदलाबदल केली.
२४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच या हालचालींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान मुंबईबाहेर गेलेल्या काही अधिकाऱ्यांना पुन्हा मुंबईत बोलावण्यात आले आहे.
मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप किसनराव भागवत यांची बदली सांगली येथे करण्यात आली आहे. ठाण्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत आता छत्रपती संभाजीनगर येथे रुजू होणार आहेत. नागपूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक शेळके यांना पुणे गुन्हे अन्वेषण विभागात पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती मिळाली आहे.
तर, नागपूरच्या सहाय्यक पोलीस आयुक्त शालिनी शर्मा यांची पुन्हा मुंबईत बदली करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांची मुंबईबाहेर बदली झाली होती. शर्मा या यापूर्वी मुंबई पोलिसांच्या इंटरपोल युनिटमध्ये कार्यरत होत्या.
याशिवाय, विविध आयुक्तालयांमध्येही अंतर्गत फेरबदल करण्यात आले आहेत. ठाण्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा पवार यांची विशेष शाखा–१ मधून आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे आता विशेष शाखेत कार्यरत राहतील, तर कापूरबावडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण माने यांना वर्तकनगर ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे.
मिरा भाईंदर–वसई–विरार पोलीस आयुक्तालयातही बदल्या करण्यात आल्या आहेत. काशिगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोगरवाड यांची बदली परवाना शाखेत करण्यात आली असून, परवाना शाखेतील वरिष्ठ निरीक्षक राहुल पाटील यांना काशिगाव ठाण्याच्या जबाबदारीवर नेमण्यात आले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मांडवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांची बदली नायगावमध्ये, तर रणजीत आंधले यांची मांडवी ठाण्यात करण्यात आली होती.
राज्यातील निवडणूक प्रक्रियेला वेग येत असताना पोलिस दलातील या बदल्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रशासनाच्या तयारीला आता अंतिम टप्पा आल्याचं संकेत या हालचालींमधून दिसत आहेत.


