मुंबई प्रतिनिधी
महागाईच्या वाढत्या लाटेत जगणाऱ्या सर्वसामान्यांसाठी राज्य सरकारकडून दिलासादायक उपक्रम. विजेचे वाढते दर आणि वाढते मासिक बिल यामुळे घरखर्चाचा ताण वाढत असताना, आता गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांना २५ वर्षे मोफत वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप’ (स्मार्ट) योजनेतून राज्यातील घरांच्या छतावर प्रत्येकी १ किलोवॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प बसवले जाणार असून, या माध्यमातून दरमहा सुमारे १२० युनिट परवडणारी वीज निर्माण होणार आहे. अतिरिक्त निर्मितीची वीज विकून ग्राहकांना उत्पन्नही मिळणार आहे.
महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी या योजनेच्या तपशिलांची माहिती देताना सांगितले की, केंद्राच्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर योजना’च्या अनुदानात भर घालत राज्य सरकारने सर्वसामान्यांसह वंचित घटकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.
योजनेचे वैशिष्ट्ये
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपक्रमाची अंमलबजावणी
दारिद्र्यरेषेखालील १.५४ लाख, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल ३.४५ लाख वीज ग्राहकांना लाभ
* एकूण ६५५ कोटींची तरतूद
* अतिरिक्त वीज विक्रीतून उत्पन्न
* ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’
अनुदानाचा तपशील
श्रेणी केंद्र सरकार राज्य सरकार एकूण सहाय्य
सर्व ग्राहक (१ किलोवॅट सौर प्रकल्प) ₹३०,००० — ₹३०,०००
दारिद्र्यरेषेखालील ₹३०,००० ₹१७,५०० ₹४७,५००
आर्थिकदृष्ट्या दुर्बल ₹३०,००० ₹१०,००० ₹४०,०००
अनुसूचित जाती/जमाती ₹३०,००० ₹१५,००० ₹४५,०००
ऊर्जानिर्मिती क्षमता
* १ किलोवॅट सौर प्रणाली
* दरमहा १२० युनिटपर्यंत वीज निर्माण
* २५ वर्षे परवडणारी वीजपुरवठा
ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने राज्यातील घरांना मोठी संधी मिळत असून, महागाईच्या काळात कमी खर्चात घरगुती वीज गरजा भागविण्याचा मार्ग या योजनेने खुला केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.


