
पुणे प्रतिनिधी
आयटी नगरी पुण्यातील हिंजवडी परिसरात शनिवारी दुपारी प्रेमसंबंधातून धक्कादायक हल्ल्याची घटना घडली. साखरे वस्ती भागात १८ वर्षीय तरुणीवर तिच्याच प्रियकराने साथीदारांसह चाकूने वार केल्याने परिसरात खळबळ उडाली. तरुणी गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी योगेश भालेराव यांच्यात काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. मात्र योगेश विवाहित असल्याचे उघड झाल्यानंतर परिस्थिती बिघडू लागली. त्याच्या पत्नीला प्रकरणाची माहिती मिळताच तिने घर सोडल्याचे समजते. त्यानंतर भालेरावने संबंधित तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकला; पण तिने नकार दिला.
दरम्यान, तरुणीचे दुसऱ्या युवकासोबत संबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर संतापाच्या भरात भालेरावने शनिवारी दुपारी दोन साथीदारांसह साखरे वस्तीत येऊन तिच्यावर चाकूने वार केले. हल्ल्यात तरुणीच्या हातावर, तोंडावर आणि शरीराच्या विविध भागांवर गंभीर जखमा झाल्या.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्परता दाखवत जखमी तरुणीला रुग्णालयात हलवले. पोलिसांनी आरोपी योगेश भालेराव, त्याचा मित्र प्रेम वाघमारे आणि एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलिस आयुक्त राकेश कुन्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे करीत आहेत.


