सांगली प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं अखेर नामकरण करण्याचा निर्णय औपचारिकपणे झाला आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारच्या प्रस्तावाला मान्यता देत इस्लामपूरचं नाव ‘ईश्वरपूर’ असं करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता इस्लामपूर शहर ‘ईश्वरपूर’ म्हणून ओळखले जाणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाने या नामांतराचा ठराव आधीच मंजूर केला होता. अधिवेशनादरम्यान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी इस्लामपूरचं ईश्वरपूर असं नामकरण करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. अखेर केंद्रानेही मान्यता दिल्याने या बदलाला अधिकृत स्वरूप प्राप्त झालं आहे.
इस्लामपूर हे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचा मतदारसंघ असल्याने, या निर्णयाला राजकीय रंग चढल्याशिवाय राहिलेला नाही. भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारचा हा निर्णय ‘राजकीय प्रतीकात्मकता’ म्हणून विरोधकांकडून टीकेचा विषय ठरत आहे.
काही विरोधी पक्ष नेते तसेच मुस्लिम संघटनांनी या निर्णयाला धार्मिक भेदभावाची छटा असल्याचं म्हटलं आहे. “शहरांची नावं बदलून इतिहास बदलत नाही; जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर उत्तरं देणं गरजेचं आहे,” अशी टीका विरोधकांकडून होत आहे. तर दुसरीकडे महायुती सरकार समर्थक मात्र याला “संस्कृती आणि स्थानिक भावनेचा सन्मान” असे म्हणत स्वागत करत आहेत.
इस्लामपूर शहराचं नाव बदलण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत होती. स्थानिक स्तरावर काही संघटनांनी आणि नागरिकांनी या बदलासाठी पाठपुरावा केला होता. आता केंद्राच्या मान्यतेनंतर प्रशासकीय स्तरावर सर्व कागदपत्रांमध्ये ‘ईश्वरपूर’ हे नाव वापरले जाणार आहे.
राज्यात अलीकडच्या काळात अशा अनेक नामांतरांच्या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत उदा. औरंगाबादचं ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचं ‘धाराशिव’ आणि आता इस्लामपूरचं ‘ईश्वरपूर’. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा नावबदलाच्या राजकारणावर चर्चा पेटली आहे.


