
ठाणे | प्रतिनिधी
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ठाणे, कल्याण आणि डोंबिवली शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ‘दिवाळी पहाट’चे आयोजन आणि गर्दी लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
ठाणे वाहतूक विभागासाठी ५० पोलिसांचा, तर परिमंडळ (ठाणे शहर) विभागासाठी १५० अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या कालावधीत ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन तसेच आकाशकंदील हवेत उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम सोमवारी आयोजित केला जाणार असून, विविध सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांकडून या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह आसपासच्या भागातून मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी या कार्यक्रमांना उपस्थित राहतात. त्यामुळे चोरी, गैरप्रकार किंवा अनुचित घटनांना आळा बसावा म्हणून नौपाडा पोलीस ठाण्यासह मुख्यालयातील सुमारे १५० पोलिसांचा बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात करण्यात आला आहे.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठीही विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राम मारूती रोडवरील गजानन चौक ते तीन पेट्रोल पंप हा मार्ग वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार असून, वाहनांना गणेशमूर्ती कारखाना, हरिनिवास चौक किंवा वंदना एसटी आगारमार्गे वळविण्यात येईल.
ठाणे विशेष शाखेच्या उपायुक्त मीना मकावाना यांनी सांगितले की, “उत्सवाच्या काळात आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येईल. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. तसेच, सुरक्षा कारणास्तव आकाशकंदील आणि ड्रोन उडविण्यास बंदी असेल.”
ठळक मुद्दे
ठाणे, कल्याण, डोंबिवलीत दिवाळी पहाट कार्यक्रमांसाठी कडक पोलिस बंदोबस्त
ड्रोन आणि आकाशकंदील उडविण्यास बंदी
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन
राम मारूती रोडवरील काही मार्गांवर प्रवेशबंदी