
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई : काळाचौकी परिसरातील बॉम्बे कॉटन मिल कंपाऊंडमधून परतताना झालेल्या तब्बल ₹२.२९ कोटींच्या सोन्याच्या दागिन्यांच्या जबरी चोरीचा छडा आर.ए.के. मार्ग पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक करून चोरीला गेलेले सर्व दागिने आणि गुन्ह्यात वापरलेले मोबाईल हस्तगत केले आहेत. विशेष म्हणजे, या गुन्ह्यामागे स्वतः फिर्यादीचाच हात असल्याचे तपासात उघड झाले आहे.
१३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ही धाडसी चोरी घडली. फिर्यादी शामलाभाई होथीभाई रबारी (३१) हे कंपनीतील सोन्याचे दागिने हॉलमार्क करून परत फॅक्टरीकडे नेत असताना, शिवडी कोर्टजवळ आर.ए.के. चार रोडवर दोन अज्ञात व्यक्तींनी मोटारसायकलवरून पाठलाग करून त्यांच्या गाडीला धक्का दिला. त्यानंतर आरोपींपैकी एकाने पिस्तूल दाखवून धमकावत फिर्यादीकडील २,०६७ ग्रॅम वजनाचे, ₹२.२९ कोटी किंमतीचे सोन्याचे दागिने बॅगसह लंपास केले.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस आयुक्त (मध्य विभाग) विक्रम देशमाने, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ४) श्रीमती रागसुधा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (माटुंगा विभाग) सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद तावडे (आर.ए.के. मार्ग पोलीस ठाणे) यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला.
सीसीटीव्ही फूटेज, तांत्रिक तपास आणि चौकशीतून पोलिसांनी सोन्याच्या कारखान्यातील जवळपास २०० कर्मचाऱ्यांची चौकशी केली. तपासादरम्यान आरोपींचा माग अहमदाबाद (गुजरात) येथे लागला. त्यानुसार पोलिस पथकाने छापा टाकून भानाराम भगराज रबारी (२१) आणि लिलाराम नागजी देवासी (२१) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील २,१८० ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत ₹२.२९ कोटी) आणि गुन्ह्यात वापरलेले मोबाईल जप्त करण्यात आले.
पुढील चौकशीत उघड झाले की, ही संपूर्ण चोरी फिर्यादी शामलाभाई होथीभाई रबारी उर्फ शंकर (३१) आणि त्याचा सहकारी जोगाराम मसरूराम देवासी उर्फ मोठा जगदीश यांनी संगनमताने घडवून आणली होती. अखेर या चौघांना अटक करून पोलिसांनी या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय परदेशी, पोउनि समाधान कदम, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी गोविंद खैरे, महेश मोहिते व त्यांचे पथक, सायबर अधिकारी योगेश खरात, एटीसी पथक तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, मदणे, शेवाळे, पोउनि अमित कदम, चौधरी, नवले, सुनील पाटील, भोसले, खाडे, प्रविण पाटील आदी अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तरीत्या उत्कृष्ट कामगिरी केली.
या प्रकरणातील पोलिसांच्या दक्ष तपासामुळे शिवडी परिसरात घडलेली मोठी चोरी उघडकीस आली असून, आर.ए.के. मार्ग पोलिसांचे तपास कौशल्य आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.