
मुंबई प्रतिनिधी
रेल्वे प्रवाशांना ऑनलाइन आरक्षण करताना आजपासून (१ ऑक्टोबर) एक महत्त्वाचा नवा नियम पाळावा लागणार आहे. तिकीट दलालांकडून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या ई-तिकीटांच्या बेकायदेशीर खरेदीवर अंकुश ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
आयआरसीटीसीने दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन आरक्षण सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या १५ मिनिटांत प्रवाशांना आधारकार्ड प्रमाणीकरण अनिवार्य राहणार आहे. त्यानंतर मात्र सर्व नोंदणीकृत वापरकर्त्यांना नेहमीप्रमाणे ई-तिकीट बुक करता येतील.
रेल्वे प्रशासनासमोर ई-तिकीटांचा काळाबाजार हे मोठे आव्हान ठरत आहे. अनधिकृत दलाल सॉफ्टवेअरचा वापर करून तिकिटे आरक्षित करतात, तर सामान्य प्रवाशांच्या हातात प्रतीक्षा यादीचे तिकीट पडते. या प्रकारावर आळा घालण्यासाठीच नवा नियम लागू करण्यात आला आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला आयआरसीटीसीने तब्बल अडीच कोटी संशयास्पद आयडी निष्क्रिय केले होते. अनधिकृत दलालांविरोधात कारवाई सातत्याने सुरूच आहे. तत्काळ आरक्षणासाठी १ जुलैपासून आधार प्रमाणीकरण सुरू झाले होतेच. आता नियमित आरक्षणातही सुरुवातीच्या काळात ही अट लागू राहणार आहे.
रेल्वे प्रवाशांनी ई-तिकीट आरक्षण करताना या बदलाची नोंद घेऊन तिकिटे बुक करावीत, असे आवाहन आयआरसीटीसीने केले आहे.