
सांगली प्रतिनिधी
दसऱ्याच्या निमित्ताने कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथे झालेल्या बिरोबा बनातील ‘‘हिंदू बहुजन दसरा मेळावा’’त आमदार गोपीचंद पडळकर यांनी नेहमीप्रमाणे आपल्या तीक्ष्ण वक्तृत्वाने राजकीय वातावरण तापवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना थेट खुले आव्हान देत त्यांनी सभागृह दणाणून सोडले. ‘‘माझ्यावर टीका करणाऱ्यांनी ठिकाण आणि वेळ सांगावी, मी हजर राहीन,’’ असे थेट शब्दांत ते म्हणाले.
हिंदुत्वाचा वारसा, ‘हिंदू बहुजनांचा दसरा मेळावा’
आपल्या भाषणाची सुरुवात करताना पडळकरांनी हिंदुत्वाचा वारसा आणि इतिहासाची दृष्टी मांडली. ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी अपार कार्य केले. संभाजी महाराजांनंतर मल्हारराव होळकरांनी हिंदू पताका उंचावली, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी मंदिरे व संस्कृतीचे जतन केले. या परंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी बिरोबा बनातील दसरा मेळावा ‘हिंदू बहुजनांचा दसरा मेळावा’ म्हणून साजरा होणार आहे,’’ असे पडळकर म्हणाले.
धनगर आरक्षणावर ठाम भूमिका
धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करताना पडळकरांनी आपली नेहमीची ठाम भूमिका अधोरेखित केली. ‘‘धनगर समाजाच्या मुलांच्या हातात ‘एसटी’चा दाखला मिळालाच पाहिजे. मी काल ज्या भूमिकेवर होतो, तीच भूमिका आज आणि उद्याही राहील. एकीकडे न्यायालयीन लढाई, तर दुसरीकडे रस्त्यावरची लढाई सुरू आहे. सरकारमध्येही मी धनगरांच्या हक्कासाठी लढतो आहे,’’ असे ते म्हणाले.
मराठा”ओबीसी तणावावर उपाय सुचवला
मराठा आरक्षणाबाबत स्पष्ट मत नोंदवत पडळकर म्हणाले, ‘‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे, याला विरोध नाही. मात्र बनावट दाखले काढून आरक्षण घेण्यास ठाम विरोध आहे. मराठा-ओबीसी वाद मिटवायचा असेल तर ‘मराठा कुणबी”कुणबी मराठा’ असा स्वतंत्र प्रवर्ग तयार करून त्यांना शिक्षण व नोकरीत आरक्षण द्यावे. मात्र राजकीय आरक्षण टाळावे. त्यामुळे संशय दूर होईल आणि वाद शमतील.
जयंत पाटलांवर जळजळीत टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व सांगलीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यावर पडळकरांनी सरळसरळ आरोपांची मालिका केली. ‘‘कवठेमहांकाळ व जत येथील कारखाने बंद पाडून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. जत कारखाना कवडीमोल दराने खरेदी करून शेतकऱ्यांची लूट केली. सांगली जिल्ह्यात अनेक क्रांतिकारक झाले; पण त्यांच्या स्मारकासाठी काही केले का? सांगलीत मोठमोठ्या सभा घेऊन मला शिव्या घालता. पण गोपीचंद कोणालाही भीक घालत नाही. माझ्या डोक्यात शिरू नका, नाहीतर एक दिवस काळीकुट्ट रात्र ठरेल,’’ असे पडळकरांनी ठणकावले.
मंगळसूत्र वादाचे प्रतिबिंब
अलीकडेच पडळकरांनी केलेल्या ‘मंगळसूत्र’ वक्तव्याची चर्चा अजूनही सुरू असताना त्यांनी पुन्हा एकदा याच विषयावरून जयंत पाटलांवर निशाणा साधला. ‘‘मी जे बोललो ते नाकारत नाही,’’ असे म्हणत त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली. यामुळे या मुद्द्यावरून नवा वाद उभा राहण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.
विकासाचा मुद्दाही पुढे
बिरोबा देवस्थानच्या विकासासाठी १६० कोटी रुपयांचा आराखडा तयार असल्याची माहिती देत पडळकर म्हणाले, ‘‘सरकारने हा आराखडा एकाचवेळी मंजूर करून कार्यवाहीला गती द्यावी, अशी मागणी आहे.
पडळकरांचे भाषण नेहमीच राजकीय समीकरणे ढवळून काढणारे ठरते. मराठा”ओबीसी आरक्षण, धनगरांचा न्याय, हिंदुत्वाचा वारसा आणि जयंत पाटलांवर केलेली थेट टीका यामुळे सांगली जिल्ह्यातील राजकारणात नव्याने खळबळ माजली आहे. पडळकरांनी वापरलेली भाषा आणि थेट आव्हान देण्याची शैली आगामी काळात राज्यातील राजकीय वातावरण अजून तापवणार, यात शंका नाही.