
मुंबई प्रतिनिधी
सप्टेंबर महिना संपायला अवघा एक दिवस शिल्लक असतानाच सोन्या-चांदीच्या बाजारात अक्षरशः धुमाकूळ पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक परतावा या महिन्यात गुंतवणूकदारांना मिळाल्याने बाजारात चैतन्य परतलं आहे.
महिन्याभरात सोन्याने 10 टक्क्यांहून अधिक, तर चांदीने तब्बल 18 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. दिवाळीला अजून सुमारे 20 दिवस बाकी असताना सोनं थेट 1.25 लाख आणि चांदी 1.50 लाख रुपये या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचणार का, असा प्रश्न गुंतवणूकदारांपुढे निर्माण झाला आहे.
महिन्याभरात किती वाढ?
गेल्या महिन्याच्या अखेरीस (31 ऑगस्ट) सोने 1,03,824 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. तेथून आजपर्यंत सोन्याच्या किमतीत 10,803 रुपयांची वाढ झाली असून गुंतवणूकदारांना 10.40% परतावा मिळाला आहे.
चांदीचा आलेख यापेक्षाही उंच गेला आहे. ऑगस्टअखेर चांदीचा भाव 1,21,873 रुपये प्रति किलो होता. तो तब्बल 22,095 रुपयांनी वाढून आज 1,43,968 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच 18.13% परतावा गुंतवणूकदारांना मिळालेला आहे.
भू-राजकीय तणाव आणि खरेदीचा ओघ
अमेरिका-चीन व्यापारयुद्धाचं सावट, मध्यपूर्वेतील तणाव आणि जगभरातील सेंट्रल बँकांची सातत्याने सुरू असलेली सोन्याची खरेदी या साऱ्या घटकांचा परिणाम थेट सोन्या-चांदीच्या दरांवर होताना दिसतोय. याशिवाय गोल्ड-सिल्वर ETF मध्ये गुंतवणूकदारांचा पैशांचा ओघ वाढल्यानेही भावांना उभारी मिळाली आहे.
दिवाळीपर्यंत नवे उच्चांक?
दिवाळीपर्यंत सोनं 1.25 लाख आणि चांदी 1.50 लाख रुपयांच्या आसपास पोहोचू शकते, असा अंदाज IIFL सिक्युरिटीजचे वेल्थ डायरेक्टर अनुज गुप्ता यांनी वर्तवला आहे. भू-राजकीय तणाव आणि सेंट्रल बँकांची सातत्याने खरेदी सुरू राहिल्यास ही वाढ अधिक वेगाने होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं.