
मुंबई प्रतिनिधी
मुंबईत पोलिस दलात खळबळ उडवणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिस कॉन्स्टेबलची त्याच्याच बायको आणि मुलाने निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी आणि मुलाला अटक केली असून शहरात संतापाची लाट उसळली आहे.
ही घटना ९ सप्टेंबर रोजी घडली. शिवाजी नगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले प्रवीण सूर्यवंशी (५२) हे सायन येथील प्रतीक्षा नगरमधील पोलिस क्वार्टरमध्ये मृतावस्थेत आढळून आले होते. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालात ३८ गंभीर जखमा आणि रक्तस्त्रावामुळे झालेला मृत्यू स्पष्ट झाल्यानंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
प्रवीण यांचे बंधू आणि नातेवाईकांनी सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला होता. त्यांनी बायको स्मिता सूर्यवंशी (४२) आणि मुलगा प्रतीक (२२) यांच्यावर आरोप केला होता. चौकशीतूनही त्यांचा संशय खरी ठरला. पोलिसांनी उघड केलेल्या माहितीनुसार, प्रवीण यांच्याकडे नाशिक आणि कल्याण येथे मालमत्ता होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी या मालमत्ता भावाकडे हस्तांतरित केल्या होत्या तसेच खर्चासाठी एटीएम कार्डही भावाकडे दिले होते. यामुळे पत्नी आणि मुलगा नाराज होते.
पोलिसांच्या तपासात असेही समोर आले की घटनेच्या दिवशी पत्नी आणि मुलानेच प्रवीण यांच्यावर घरी हल्ला केला. त्यांना खिडकीवर जोराने ढकलल्याने काच फुटली आणि खोलवर जखमा झाल्या. अखेर या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला.
मुंबई पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने संपूर्ण पोलिस दल हादरले असून कुटुंबातील वाद किती टोकाला जाऊ शकतो याचे भयावह चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.