
मुंबई प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोसळलेल्या अवकाळी पावसाने मराठवाड्यासह जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यांत हाहाकार माजवला आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत तर अतिवृष्टीने कहर केला असून शेतकरी आणि सामान्य जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या जीवितहानीचाही या आपत्तीने बळी घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली. जिल्ह्यांचे पालकमंत्रीदेखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. या संकटाच्या काळात राजकीय पातळीवरूनही मदतीचा हात पुढे येऊ लागला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार आणि आमदार यांनी एका महिन्याचा पगार आपत्तीग्रस्तांसाठी जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्राद्वारे दिली. शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या दु:खाच्या या कठीण काळात राष्ट्रवादी ठामपणे पाठीशी उभी आहे. आगामी काळात आणखी मदत आणि दिलासा देणाऱ्या उपाययोजना जाहीर केल्या जातील, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार पूरग्रस्त भागांना भेट देत असून, तातडीने मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्योगसमूह व कंपन्यांनी आपल्या सीएसआर फंडातून मदत करावी, असे आवाहन केले आहे.
शिवसेनेच्या आमदारांनीही शेतकऱ्यांसाठी एकजूट दाखवत एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. नैसर्गिक आपत्तीच्या काळात शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिली आहे. मदत करण्यास हात आखडता घेतला जाणार नाही,” असे शिंदे म्हणाले.
पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी उचललेले हे पाऊल स्वागतार्ह ठरत आहे. मात्र, प्रत्यक्ष मदत कितपत लवकर पोहोचते, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.