
मुंबई प्रतिनिधी
मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांचा दैनंदिन निर्वाह भत्ता आणि विद्यार्थिनींसाठीच्या स्वच्छता प्रसाधन भत्त्यात तब्बल दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा हजारो विद्यार्थ्यांना थेट फायदा होणार आहे.
सन २०२२ पासून या वाढीची मागणी सातत्याने केली जात होती. वाढत्या महागाईमुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अत्यल्प रकमेवर दिवस काढावा लागत होता. विशेषत: पुणे, मुंबईसारख्या शहरांत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण व मागास भागातील विद्यार्थ्यांसाठी हा दिलासा महत्त्वाचा ठरणार आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. महागाई निर्देशांकाच्या आधारे भत्ता निश्चित करण्याबाबतही सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे संकेत मिळाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या मागणीसाठी आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन, महाराष्ट्र यांनी गेली काही वर्षे सातत्याने आंदोलनाचा मार्ग अवलंबला होता. समाजकल्याण खात्याचे मंत्री, आयुक्त, सचिव यांना वारंवार निवेदन देत भत्तेवाढीची मागणी करण्यात आली होती. सन २०१९ मध्ये, फेब्रुवारी २०२२ मध्ये तब्बल १४ दिवस आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये पाच दिवस असे आंदोलन संघटनेने केले होते. अखेर, शासनाने उशिरा का होईना हा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.
“विद्यार्थ्यांचा भत्ता वाढवण्याचा निर्णय हा आमच्या सातत्यपूर्ण संघर्षाचा विजय आहे. शासनाने यावर सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल आम्ही स्वागत करतो,” अशी प्रतिक्रिया संघटनेचे कार्याध्यक्ष बुद्धभूषण राजरत्न यांनी व्यक्त केली.