
मुंबई प्रतिनिधी
दिंडोशी परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरातील दागिने चोरीला गेल्याची तक्रार नोंदवणाऱ्या महिलेलाच अखेर पोलिसांनी अटक केली. चौकशीत उघड झाले की, या महिलेला आपल्याच मुलीच्या १८ वर्षीय मित्राशी प्रेमसंबंध होते आणि त्यासाठी तिने पतीचे दागिने चोरून प्रियकराला दिले होते.
गोरेगाव (पूर्व) येथील बीएमसी कॉलनीत राहणाऱ्या उर्मिला रमेश हळदिवे (नाव बदललेले) हिने काही दिवसांपूर्वी दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. घरातील साडेदहा तोळे सोने चोरीला गेल्याचे तिने पोलिसांना सांगितले होते. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक अजित देसाई यांच्या पथकाने सुरू केला.
तपासात घरफोडीचा कोणताही ठसा न सापडल्याने पोलिसांचा संशय घरच्यांवर गेला. त्यानंतर सर्व कुटुंबीयांचे कॉल रेकॉर्ड व मोबाईल लोकेशन तपासले असता पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. उर्मिलाचे आपल्याच मुलीच्या १८ वर्षीय मित्राशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. तिने या तरुणाला अनेकवेळा दागिने दिल्याचे पोलिसांना कळले.
तपासाअंती उर्मिलाने गुन्ह्याची कबुली दिली. पतीच्या नकळत तिने घरातील दागिने घेतले, त्यातील काही विकून तब्बल दहा लाख रुपये प्रियकराच्या खात्यात वर्ग केले. त्याला संपन्न करून त्याच्यासोबत नवे आयुष्य जगण्याचा तिचा बेत होता. मात्र, पोलिसांच्या दक्ष तपासामुळे हा गुन्हा उघड झाला.
या प्रकरणी पोलिसांनी उर्मिलाला अटक करून दागिने जप्त केले आहेत. अचानक उघड झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.