
मुंबई प्रतिनिधी
नेपाळमधील राजकीय अस्थिरतेत आणि हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील १५० हून अधिक पर्यटक अडकले असून त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. या पर्यटकांमध्ये सर्वाधिक ६५ जण ठाणे जिल्ह्यातील आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट अनेक पर्यटकांशी संवाद साधत धीर देण्याबरोबरच परत आणण्यासाठी केंद्र सरकारशी समन्वय साधून प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही दिली आहे.
शिंदे यांनी मुंबई, ठाणे, मुरबाड तालुका तसेच राज्यातील इतर भागांतील पर्यटकांशी फोनवरून संवाद साधला. त्यांच्याकडे चौकशी करून ज्या ठिकाणी ते थांबले आहेत तेथील परिस्थितीबाबत माहिती घेतली. “घाबरून जाण्याचे कारण नाही, राज्य शासन केंद्राशी संपर्कात असून आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत,” असे आश्वासन त्यांनी दिले.
राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी सांगितले की, नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी सतत संपर्क ठेवण्यात येत आहे आणि सर्वजण सुरक्षित आहेत. ही संख्या आणखी वाढू शकते, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. पुणे आणि मुंबई येथील ज्येष्ठ नागरिकांनी थेट आपल्या नातेवाईकांमार्फत केंद्र सरकारला तातडीच्या मदतीची विनंती केली आहे.
अडकलेल्या पर्यटकांची जिल्हानिहाय आकडेवारी अशी – ठाणे जिल्हा ६५, पुणे ५, मुंबई ६, अकोला १०, यवतमाळ १, लातूर २, नाशिक शहर ४ आणि कळवणमधील काही नागरिक. याशिवाय पुणे व मुंबईतील २३ ज्येष्ठ नागरिकांचा गट नेपाळमध्ये आहे. तसेच कैलास मानसरोवर यात्रेकरूंपैकी १२ जण चीन सीमेजवळील कुरुंग प्रांतात अडकले आहेत.
भारतीय दूतावासाने सर्व पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले असून, स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे. पर्यटक ६ वेगवेगळ्या टूर ऑपरेटरमार्फत नेपाळला गेले होते. बीडमधील ११ पर्यटक मात्र बसमार्गे सुरक्षितपणे उत्तर प्रदेशात पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, विमानसेवा शुक्रवारपर्यंत पूर्ववत होण्याची शक्यता असल्याने परतीची प्रक्रिया गती घेईल. नेपाळमधील हिंसक परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील ठाणे, पुणे, मुंबई, नाशिक, अकोला, यवतमाळ, लातूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटक विविध हॉटेल्समध्ये अडकले आहेत. राज्य सरकारने या संदर्भातील आकडेवारी जाहीर केली असून पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी केंद्राशी सातत्याने संपर्क साधला जात आहे.