
मुंबई प्रतिनिधी
लाडक्या बाप्पााला निरोप देण्यात आला, राज्यभरात मोठ्या उत्साहात विसर्जन मिरवणुका पार पडल्या, मात्र काही ठिकाणी गणपती विसर्जनासाठी आलेल्या भाविकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना देखील घडल्या आहेत.
नाशिकमध्ये गणेश विसर्जनावेळी तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, तर धुळ्यात गणपती विसर्जन करून परतणाऱ्या तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुसरीकडे मीरा भाईंदरमध्ये देखील विसर्जन मिरवणुकीवेळी मोठी दुर्घटना घडली आहे. विजेच्या तारांना स्पर्श होऊन तरुणाचा जागीच मृत्यू आहे, तर अन्य एक तरुण थोडक्यात बचावला. नांदेड, मुंबईमध्ये देखील अशाच काही घटना घडल्या आहेत.
नाशिकमध्ये तिघाचां मृत्यू
नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जनावेळी वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पहिल्या घटनेत आनंदवल्ली येथे गोदावरी नदीच्या प्रवाहात दोघे वाहून गेले होते.मात्र एक जण पोहून बाहेर आल्याने बचावला. तर दुसरा तरुण प्रवीण शांताराम चव्हाण या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या घटनेत बोरगड येथील चंदर नथू माळेकर (वय २९) रा. म्हसोबावाडी,यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तिसऱ्या घटनेत सिन्नर शहराजवळ असणाऱ्या सरदवाडी धरणात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या ओमप्रकाश सुंदरलाल लिल्हारे वय ४० यांचा बुडून मृत्यू झाला.
धुळ्यात एकाचा मृत्यू
गणपतीचं विसर्जन करून परतणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना धुळे जिल्ह्यात घडली आहे.शिरपूर तालुक्यातील तापी नदीमध्ये गणपतीचं विसर्जन करून हा तरुण दुचाकीवरून परत होता, याचदरम्यान हा अपघात झाला, शुभम सांगवी असं या तरुणाचं नाव आहे.
मीरा भाईंदरमध्ये तरुणांचा मृत्यू
गणपती विसर्जन मिरवणुकीच्या वेळी मीरा भाईंदरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. विजेच्या तारांना स्पर्श झाल्यानं एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक तरुण थोडक्यात बचावला. मीरा भाईंदरप्रमाणेच मुंबईच्या साकीनाका परिसरात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर या घटनेत पाच जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
नांदेडमध्ये दोन बेपत्ता
नांदेड जिल्ह्यातही गणेश विसर्जनादरम्यान अशीच दुर्दैवी घटना घडली आहे, गाडेगाव शिवारातील आसना नदीत गणपती विसर्जनासाठी उतरलेले तिघे जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यापैकी एकाला वाचवण्यात यश आले. मात्र अजूनही दोन जण बेपत्ता आहेत. तर शहापूर तालुक्यात तीन जणांचा आणि अमरावतीमध्ये वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे.