
मुंबई प्रतिनिधी
अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी कोसळलेल्या सरींमुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये तब्बल ९७ टक्के पाणीसाठा जमा झाल्याची माहिती महापालिकेने दिली. त्यामुळे पुढील वर्षापर्यंत पाणीटंचाईची भीती नाही, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार ६ सप्टेंबरपर्यंत सर्व धरणांमध्ये मिळून १४,०५,४३७ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे, जो त्यांच्या एकूण क्षमतेच्या ९७.१० टक्के इतका आहे.
धरणांची स्थिती
मोडक सागर, विहार आणि तुळशी तलाव शंभर टक्के क्षमतेवर भरले आहेत. तानसा धरण ९८.८५ टक्के, अप्पर वैतरणा ९८.०९ टक्के, मध्य वैतरणा ९६.८९ टक्के तर सर्वात मोठा भातसा प्रकल्प ९५.८३ टक्के भरलेला आहे.
पाणीपुरवठा विभागणी
लोअर वैतरणा (मोडक सागर), मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा आणि तानसा या धरणांमधून पश्चिम उपनगर (दहिसर ते वांद्रे) आणि दक्षिण मुंबईच्या काही भागांना पाणीपुरवठा केला जातो.
तर भातसा, विहार आणि तुळशी प्रकल्पातून पूर्व उपनगर (मुलुंड चेक नाका ते सायन) आणि पंजरापूर केंद्रामार्फत माझगाव भागाला पाणीपुरवठा केला जातो.
पावसाचा यलो अलर्ट
हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी पिवळा इशारा दिला आहे. काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकांदरम्यान किनारपट्टीवरील ठिकाणी नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.