
मुंबई प्रतिनिधी
‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता वाढली आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार २१ वर्षांखालील आणि ६५ वर्षांवरील महिला या योजनेस अपात्र ठरणार आहेत. जुलै २०२४ पासून जिल्ह्यांत या योजनेची अंमलबजावणी सुरू असून आतापर्यंत एकूण १० लाख ४७ हजार ७३० महिलांनी अर्ज केला होता. यापैकी सर्व पात्र लाभार्थ्यांना १७ हप्ते वितरित झाले आहेत.
सध्या २१ वर्षांखालील व ६५ वर्षांवरील १४ हजार २५४ महिलांची पडताळणी सुरू आहे. त्याचबरोबर एका घरात दोन लाभार्थी असलेल्या ८७ हजार १९५ प्रकरणांची तपासणीही केली जात आहे. अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, पडताळणीनंतर जवळपास दहा टक्के महिलांची नावे यादीतून वगळली जाऊ शकतात.
कुटुंबाच्या व्याख्येनुसार एका घरात सासू व तिच्या सुना पात्र ठरतात; मात्र विवाहित अथवा अविवाहित मुलींमध्ये केवळ एकीला लाभ मिळणार आहे. विधवा महिलांना मात्र योजना लागू राहणार असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
जुलै २०२४ मध्ये १७ वा हप्ता वितरित झाला. जिल्ह्याला दर महिन्याला सुमारे १५५ कोटी रुपये खर्च करावे लागत असून पडताळणीनंतर या रकमेतील कपात होणार आहे.
दरम्यान, शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वयंप्रेरणेने या योजनेतून बाहेर पडणाऱ्या महिलांची संख्या २६३ वर पोहोचली आहे. शासकीय नोकरीत असलेल्या, आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या किंवा कारवाईच्या भीतीमुळे काही महिलांनी लाभ बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
अंगणवाडी सेविका, सुपरवायझर व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या माध्यमातून पडताळणीचे काम सुरू असून, दोन लाभार्थी असलेल्या घरांत विवाहित महिला आणि तिची अविवाहित मुलगी या दोघींना लाभ मिळणार नाही. अशा प्रकरणांमध्ये एका लाभार्थीचा हप्ता थांबवला जाणार आहे.
महिला व बालविकास विभागाने “ज्या महिलांना स्वयंस्फूर्तीने योजना सोडायची आहे, त्यांनी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा,” असे आवाहन केले आहे.