मुंबई प्रतिनिधी
अनंत चतुर्थीच्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी संपूर्ण मुंबई सज्ज झाली आहे. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी यंदा पहिल्यांदाच मुंबई पोलिसांकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे.
मुंबई पोलिसांनी २२ हजारांचा तगडा बंदोबस्त उभारला असून, विसर्जन मिरवणुका आणि विविध घाटांवर लक्ष ठेवण्यासाठी तब्बल १० हजार सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे आणि एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी दिली.
वाहतुकीवरही कडक नजर
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आले आहेत. तब्बल ३ हजार वाहतूक पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान आणि ४ उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती सह पोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी आणि जुहू परिसरात विशेष वाहतूक योजना राबविण्यात आली आहे.
काटेकोर सुरक्षा व्यवस्था
मुंबईतील ६५०० सार्वजनिक मंडळे, दीड ते दोन लाख घरगुती गणपती, ६५ नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि २०५ कृत्रिम तलावांवर पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी १२ अतिरिक्त आयुक्त, ४० डीसीपी, ६१ एसीपी, ३ हजार अधिकारी आणि १८ हजार अंमलदार कार्यरत राहणार आहेत.
याशिवाय, राज्य राखीव पोलिस दलाच्या १४ तुकड्या, शीघ्र कृती दलाच्या ४ तुकड्या, दंगल नियंत्रण पथके, बॉम्ब निकामी पथक तसेच कोस्टगार्डची मदतही घेण्यात आली आहे. गर्दीच्या ५२ ठिकाणी टॉवर उभारले असून समुद्रकिनाऱ्यावर ५२० सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. टप्प्याटप्प्याने रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या असून, कोणत्याही परवानगीशिवाय ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे.
तंत्रज्ञानाचा मोठा वापर
राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याने पोलिसांनी यंदा बंदोबस्त अधिक काटेकोर केला आहे. विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पाडण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत असून नागरिकांच्या सुरक्षेलाच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.


