
मुंबई प्रतिनिधी
राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मालिका सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी तृप्ती धोडमिसे आणि विशाल नरवडे यांची बदली झाल्यानंतर आता पुन्हा तीन अधिकाऱ्यांची नवीन नियुक्ती करण्यात आली आहे.
महिनाभरात दुसऱ्यांदा बदलीचा फटका बसलेले अजित कुंभार (IAS:RR:2015) यांची नियुक्ती मुंबईतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. नुकतेच त्यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र अॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MAIDC) येथे बदली झाली होती.
तर नंदकुमार बेडसे (IAS:RR:2015) यांना पुण्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष पद सोपविण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी असलेल्या अनुष्का शर्मा (IAS:RR:2023) यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती प्रकल्प अधिकारी, ITDP भामरागड तसेच अटापल्ली उपविभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे बदल महत्त्वाचे मानले जात आहेत.