
मुंबई प्रतिनिधी
व्यावसायिक गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल ५१ रुपयांची कपात केली आहे. नवे दर १ सप्टेंबरपासून लागू झाले आहेत.
या कपातीनंतर दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किरकोळ किंमत १,५८० रुपये इतकी ठरली आहे. याआधी ती किंमत १,६३१.५० रुपये होती. दरम्यान, १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
सलग कपातींचा प्रवाह
यंदा जानेवारीपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने घट होत आहे. १ जानेवारीला १४.५० रुपयांची कपात, फेब्रुवारीत ७ रुपयांची कपात झाली होती. मात्र १ मार्च रोजी दरांमध्ये सहा रुपयांची वाढ झाली. त्यानंतर एप्रिलमध्ये ४१ रुपये, मे महिन्यात १४ रुपये, जूनमध्ये २४ रुपये, जुलैमध्ये तब्बल ५८.५० रुपये आणि ऑगस्टमध्ये ३३.५० रुपयांची कपात झाली होती.
आता पुन्हा सप्टेंबरच्या सुरुवातीलाच दरकपात झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंट तसेच व्यावसायिक वापरकर्त्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.