
मुंबई प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजाद मैदान येथे सुरू असलेल्या आंदोलनाचे वार्तांकन करताना महिला पत्रकारांसह काही माध्यम प्रतिनिधींना वारंवार गैरवर्तन आणि अयोग्य वागणुकीला सामोरे जावे लागत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकाराचा मुंबई क्राइम रिपोर्ट्स असोसिएशनने तीव्र निषेध नोंदवला आहे.
संघटनेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आंदोलनाच्या व्यासपीठावर पत्रकारांशी केलेले हे वर्तन लोकशाहीच्या मूल्यांना बाधा आणणारे आहे. त्यामुळे श्री. मनोज जरांगे पाटील यांनी तातडीने अशा गैरवर्तनासाठी जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करून, पुढील काळात अशा घटना होऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची तातडीने दखल घेतल्याबद्दल संघटनेने जरांगे पाटील यांचे आभार मानले आहेत. मात्र, आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या सर्व पत्रकारांना सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि निर्भय वातावरण मिळावे, यासाठी आंदोलनस्थळी आवश्यक ती सुव्यवस्था राखणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई क्राइम रिपोर्ट्स असोसिएशनच्या वतीने या संदर्भात औपचारिक निवेदन जारी करण्यात आले आहे.