
मुंबई प्रतिनिधी
ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस आज संपत आहे. उद्यापासून सप्टेंबर महिन्याची सुरुवात होईल आणि नव्या महिन्याच्या सुरुवातीलाच काही महत्वाचे बदल अमलात येणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार असून घरगुती बजेट, गुंतवणूक तसेच बँकिंग सेवांवरही त्याचे पडसाद उमटतील. म्हणूनच हे नियम आधीच जाणून घेणे आणि त्यानुसार नियोजन करणे प्रत्येकासाठी आवश्यक ठरणार आहे.
एलपीजी सिलेंडरचे नवे दर
दर महिन्याच्या पहिल्या दिवशीप्रमाणेच १ सप्टेंबर रोजीही तेल कंपन्या एलपीजी गॅसच्या किंमती जाहीर करतील. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांवर या किंमती ठरतात. किंमतवाढ झाल्यास स्वयंपाकघरावरील भार वाढेल, तर घट झाल्यास काहीसा दिलासा मिळू शकतो.
चांदीवर हॉलमार्किंग अनिवार्य
आतापर्यंत केवळ सोन्यासाठी हॉलमार्किंग बंधनकारक होते. मात्र, १ सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांनाही हॉलमार्किंगचे बंधन असणार आहे. यामुळे ग्राहकांना शुद्धता आणि मानकांची खात्री मिळेल. तथापि, या निर्णयाचा परिणाम चांदीच्या किंमतींवर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
एसबीआय क्रेडिट कार्ड नियमांत बदल
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) क्रेडिट कार्डधारकांसाठी काही नवे नियम लागू केले आहेत. विशेष म्हणजे, ऑटो डेबिट फेल झाल्यास ग्राहकांकडून २ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.
एटीएममधून कॅश काढणे महाग
एटीएम व्यवहारांच्या नियमांतही सुधारणा करण्यात आली आहे. ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढल्यास ग्राहकांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे.
फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर बदल
सप्टेंबर महिन्यात बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात बदल होण्याची शक्यता आहे. सध्या ६.५ ते ७.५ टक्के व्याजदर देण्यात येत असला तरी त्यात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.