
सातारा प्रतिनिधी
साताऱ्यातील आयटी पार्कसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असून पुणे–बंगळूर महामार्गालगतच्या लिंबखिंड व नागेवाडी परिसरातील ४६ हेक्टर शासकीय जागेचे ड्रोन सर्वेक्षण शुक्रवारी करण्यात आले. सातारा औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने झालेले हे सर्वेक्षण सुमारे दीड तास चालले.
सुरुवातीला येथील ११३ एकर शासकीय जागा जिल्हा प्रशासनाकडून शासकीय औद्योगिक वसाहतीकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यानंतर आयटी पार्कच्या उभारणीसाठी पुढील टप्पे पार पडणार आहेत. या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा केला आहे.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी चार महिन्यांपूर्वीच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे लिंबखिंड व नागेवाडी परिसरातील शासकीय जागेवर आयटी पार्क उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार शुक्रवारी सकाळी ११ वाजता झालेल्या हवाई सर्वेक्षणात जमिनीची हद्द, गट क्रमांक, पर्यायी रस्त्यांची उपलब्धता आदी बाबींचा अभ्यास करण्यात आला.
“साताऱ्यात आयटी पार्कची उभारणी व्हावी यासाठी शासनाशी सातत्याने संपर्क ठेवला जात आहे. ड्रोन सर्वेक्षणानंतर अधिसूचना लवकरच प्रसिद्ध केली जाईल. यासोबतच कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचाही प्रस्ताव सादर करण्यात आला आहे,” अशी माहिती मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
सातारा शहर हे पुण्यापासून दीड तासाच्या अंतरावर असल्याने लिंबखिंड व नागेवाडीतील जागा आयटी पार्कसाठी अत्यंत योग्य ठरणार आहे. या प्रकल्पामुळे सातारकर तंत्रस्नेही विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यासह पायाभूत सुविधांचा विकास होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.