
कराड प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात महिलांना स्वावलंबी करण्यासाठी राबवण्यात आलेल्या उमेद अभियानाला मोठे यश मिळाले आहे. या उपक्रमातून जिल्ह्यातील तब्बल नऊ हजारांहून अधिक महिला ‘लखपती दीदी’ बनल्या आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाने काही निवडक महिलांना दिल्ली येथे विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले. त्यात सातारा जिल्ह्यातील तब्बल १६ महिलांचा समावेश होता.
दिल्लीतील या विशेष कार्यक्रमात ‘लखपती दीदींना’ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत स्नेहभोजनाचा मान मिळाला. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या आत्मनिर्भर संघटन उत्कृष्ट प्रभाग संघ पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी होण्याची संधीही त्यांना मिळाली. या सन्मानाने साताऱ्यातील महिला भारावून गेल्या.
महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने १४ वर्षांपूर्वी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला सुरुवात केली. महाराष्ट्रात या अभियानाला उमेद नावाने गती देण्यात आली असून प्रत्येक गावात महिला उत्पादक गटांच्या माध्यमातून महिलांना व्यावसायिक दृष्ट्या सक्षम करण्यात येत आहे. त्यातूनच ‘लखपती दीदी’ उपक्रमाचा उदय झाला आहे.
“केंद्र व राज्य शासनाने आम्हाला दिलेली ही संधी आमच्या आयुष्यातील मोठा टप्पा आहे. पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं, राष्ट्रपतींसोबत संवाद साधणं हे स्वप्नवत होतं. यापुढे आणखी महिलांना लखपती बनवण्यासाठी प्रयत्न करू,” असं समाधान व्यक्त केलं आरळे (ता. सातारा) येथील अश्विनी कदम यांनी.
“लखपती दीदींनी आता इतर महिलांसाठी रोल मॉडेल बनावं. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जिल्ह्यातील महिलांनी आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करावी. त्याला जिल्हा परिषदेचा पूर्ण पाठिंबा राहील,” असं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी सांगितलं.
या कार्यक्रमात साताऱ्यातील रूपाली जाधव (करनवडी), जयश्री जमदाडे (नायगाव), शैला पवार (धोंडेवाडी), वैशाली धर्मे (रेठरे बुद्रुक), मंगल हजारे (कोपर्डे हवेली), सुवर्णा देशमुख (कापील), मंगल मर्ढेकर (कुडाळ), शोभा रांजणे (दापवाडी), अंजना कुंभार (परळी), छाया कदम (आरळे), अश्विनी कदम (आरळे), सरस्वती निकम (मुंगसेवाडी), भाग्यश्री जाधव (ओझर्डे), सुजाता महागडे (परखंडी), रुबिना मुलांची (कुळकजाई) आणि स्वप्नाली जाधव (जांब खुर्द) यांचा समावेश होता.
ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनाचा हा यशोगाथा केवळ साताऱ्यासाठीच नव्हे तर राज्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.