
पुणे प्रतिनिधी
राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, कोकण व मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर आज (ता. २९) मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाच्या सरींची शक्यता असल्याने येलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र जमिनीवर सरकल्याने छत्तीसगड परिसरात ते सक्रिय झाले आहे. या प्रणालीला जोडून समुद्र सपाटीपासून तब्बल ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. दरम्यान, गंगानगर, शिवपुरी, दामोह, कलिंगपट्टम मार्गे बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने मॉन्सूनला नवसंजीवनी मिळाली आहे.
त्याचा परिणाम म्हणून, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला, तर उर्वरित राज्यात हलक्याफुलक्या सरी कोसळल्या. गुरुवारपर्यंतच्या (ता. २८) २४ तासांत ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
आज (ता. २९) पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दक्षिण महाराष्ट्र वगळता उर्वरित भागात विजांसह पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.