
पिंपरी प्रतिनिधी
महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतली आहे. कासारवाडी येथील छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकणारी श्रावणी टोनगे हिची निवड जर्मनीतील युनायटेड वर्ल्ड कॉलेज – रॉबर्ट बॉश कॉलेजमध्ये झाली आहे.
२८ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात श्रावणीचा प्रवेश निश्चित झाला असून तिला शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळाली आहे. महाराष्ट्रातून या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणारी ती यंदाची एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे.
श्रावणी नुकतीच दहावीची परीक्षा ९३ टक्के गुणांसह उत्तीर्ण झाली. अकरावी-बारावीच्या शिक्षणासाठी ती आता जर्मनीला जाणार आहे. या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात विज्ञान, गणित, अर्थशास्त्र यांसारख्या विषयांचा अभ्यास ती करणार आहे.
श्रावणीचे वडील खासगी शाळेत शिक्षक असून आई खासगी कंपनीत नोकरी करतात. साध्या कुटुंबातील असूनही श्रावणीने केवळ शैक्षणिकच नव्हे, तर क्रीडा व सहशालेय उपक्रमांतूनही आपले कौशल्य सिद्ध केले आहे. शाळेच्या बास्केटबॉल संघाची ती कर्णधार राहिली असून डिस्कस थ्रो स्पर्धेत सुवर्णपदकही तिने पटकावले आहे.
शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची निवड अनेक टप्प्यांमधील परीक्षा, चर्चा, मुलाखत व उपक्रमांवर आधारित केली जाते. या प्रक्रियेत श्रावणीचे नेतृत्वगुण, सामाजिक जाणिवा आणि शैक्षणिक क्षमता विशेषत्वाने अधोरेखित झाल्या.
श्रावणीने अनेक शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा व विविध शिष्यवृत्ती परीक्षा यांत तिने यश मिळवले.
“महापालिकेच्या शाळेत मला फक्त शिक्षणच नाही, तर स्वप्नं पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली. माझ्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा आणि शाळेचे वातावरण यांचा मोठा वाटा आहे. युनायटेड वर्ल्ड कॉलेजमध्ये शिकण्याची संधी माझ्यासाठी आयुष्य बदलणारी आहे. हे यश मी माझ्या शिक्षकांना, कुटुंबाला आणि महापालिकेच्या शिक्षण विभागाला समर्पित करते.”
– श्रावणी टोनगे