मुंबई प्रतिनिधी
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी मोठी घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील भगिनींना नवे आश्वासन दिले. दादर येथील योगी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी “एक कोटी भगिनींना ‘लखपती दीदी’ बनवणार” अशी घोषणा केली.
'लखपती दीदी' कार्यक्रमात महाराष्ट्र देशात प्रथम.!
'लखपति दीदी' कार्यक्रम में महाराष्ट्र देश में प्रथम..!
('राखी प्रदान' कार्यक्रम | मुंबई | 23-8-2025)#Maharashtra #RakshaBandhan #WomenEmpowerment pic.twitter.com/qN7CupkP83
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 23, 2025
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘लखपती दीदी’ योजनेत महाराष्ट्र आघाडीवर असून मागील वर्षी तब्बल २५ लाख भगिनी या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या. “यंदाही तेवढ्याच भगिनी लखपती बनतील आणि येत्या काळात एक कोटी भगिनींना या योजनेंतर्गत सक्षम करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राख्यांचा ओघ
मुख्यमंत्री फडणवीस यांना राज्यभरातून आतापर्यंत ३६ लाखांहून अधिक भगिनींनी राख्या पाठवल्या आहेत. “यामागे भगिनींचे निस्सीम प्रेम आणि आशीर्वाद आहे. महिलांशिवाय राज्याचा विकास शक्य नाही. त्यांच्याच सहभागातून सक्षम महाराष्ट्र उभा राहील,” असे त्यांनी सांगितले.
पाच वर्षे योजना बंद नाहीत
“काहीजण म्हणत होते की निवडणुकीपुर्त्या या योजना आहेत. निवडणुका संपल्या, महिने गेले. मी स्पष्ट सांगतो – पुढील पाच वर्षांत एकही योजना बंद होणार नाही. पाच वर्षांनी पुन्हा बहिणींच्या आशीर्वादाने सरकार आलं तर त्या पुढेही सुरू राहतील,” असे फडणवीस म्हणाले.
महिला सक्षमीकरणावर भर
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतून दिल्या जाणाऱ्या निधीच्या साहाय्याने महिलांनी स्वावलंबनाचे नवे मार्ग शोधले आहेत, असे सांगून त्यांनी विविध योजनांमधून दिलेले कर्ज शंभर टक्के वसूल झाल्याचा उल्लेख केला. “महिलांना उद्योग, व्यवसाय क्षेत्रात प्रोत्साहन देण्यात येईल. महिला सहकारी संस्थांना शासन हक्काची कामे देणार आहे,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
“महिला सक्षम झाल्या तर परिवार सक्षम होतो आणि त्यातून समाज व राज्य बळकट होते. शेवटच्या घटकापर्यंत पोचणाऱ्या योजनांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.


