
पुणे प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आता ओसरत चालल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. कोकण, मुंबई, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गेल्या तीन-चार दिवसांत पावसाने हाहाकार घातला होता. नद्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले, तर शेतीचे मोठे नुकसान झाले.
मात्र आता शनिवारपासून (२३ ऑगस्ट) राज्यात पावसाची उघडीप सुरू होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गुरुवार-शुक्रवारी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल; पण त्यानंतर बहुतांश भागांत पावसाला विराम मिळेल. त्यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
मागील काही दिवसांचा तडाखा
मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक घाटमाथ्यावर पावसामुळे मोठी हानी झाली. अनेक गावांत वाहतूक ठप्प झाली, तर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. कोकण किनारपट्टीसह विदर्भातही पावसाचा जोर कायम होता.
पुढील काही दिवसांसाठी अंदाज
* कोकण : २६ ऑगस्टपर्यंत काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस.
* विदर्भ : मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता.
* मराठवाडा व मध्य महाराष्ट्र : घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पाऊस.
यलो अलर्टची माहिती
* २१ ऑगस्ट : मुंबई, पालघर, नाशिक घाटमाथा.
* २१ ते २४ ऑगस्ट : रायगड व रत्नागिरी.
* २१ ऑगस्ट : पुणे घाटमाथा.
* २१-२२ ऑगस्ट : सातारा घाटमाथा.
* २३-२४ ऑगस्ट : भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा.
* २४ ऑगस्ट : अमरावती.
दिलासा देणारे चित्र
राज्यातील अनेक भागांत पुरामुळे शेती, रस्ते, पूल यांचे मोठे नुकसान झाले असले तरी, पावसाचा जोर ओसरत असल्याने परिस्थितीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे. हवामान खात्याने नागरिकांना पुढील काही दिवस सावध राहण्याचे आवाहन केले आहे.