
भाईंदर प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यभरात कडेकोट बंदोबस्त असतानाच भाईंदरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मिरा-भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या केवळ २४ वर्षीय पोलीस शिपायाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली असून, पोलीस कर्मचाऱ्यांवरील मानसिक ताणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मृत शिपायाचे नाव रितिक भाऊसाहेब चव्हाण (२४, रा. नाशिक) असे असून, २०२३ मध्ये भरती झाल्यानंतर त्यांची नियुक्ती भाईंदर पोलीस ठाण्यात झाली होती. सध्या ते भाईंदर पश्चिमेतील बेकरी गल्ली येथे भाड्याच्या घरात वास्तव्यास होते.
एकट्याने घेतले टोकाचे पाऊल
गुरुवारी दुपारी चव्हाण हे घरी एकटे असताना त्यांनी गळफास घेतला. बराच वेळ घर बंद असल्याने आणि हालचाल न झाल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी घरात डोकावले असता रितिक यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवला.
तपास सुरु
या आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी दिली. नुकतेच सेवेत दाखल झालेले तरुण शिपाई रितिक चव्हाण यांनी इतके टोकाचे पाऊल उचलल्याने सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस कर्मचारी ड्युटीवर असताना घडलेली ही घटना अधिकच वेदनादायी ठरली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांवरील वाढता ताण आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष या मुद्द्यांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.