
सोलापूर प्रतिनिधी
सध्या फेसबुकवर “मी माझी वैयक्तिक माहिती व फोटो वापरण्याची परवानगी देत नाही” असा मजकूर असलेला पोस्ट झपाट्याने व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये फेसबुक किंवा मेटा उद्यापासून तुमचे फोटो वापरण्याची परवानगी घेतील, म्हणून हा मेसेज आजच पोस्ट करा, नाहीतर परवानगी दिल्याचे समजले जाईल असा दावा केला जातो.
मात्र, हा दावा पूर्णपणे खोटा असून, कोणीतरी अज्ञानातून पोस्ट केलेला मेसेज इतरांनी तसाच पुढे फॉरवर्ड केल्याचे सोलापूर शहर सायबर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
फॉरवर्डच्या फैरी आणि फसवणुकीचा सापळा
सायबर पोलिसांच्या माहितीनुसार, अशा व्हायरल मेसेजचा कोणताही कायदेशीर आधार नाही. सोशल मीडियावर न पडताळलेले मेसेज शेअर केल्यामुळे फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप हॅकिंग, अनोळखी क्रमांकावरून आलेले कॉल किंवा लिंकवर क्लिक करून वैयक्तिक माहिती भरण्याचे आमिष — या सर्वांत अनेक सुशिक्षित व्यक्तीही अडकत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अल्पावधीत जास्त पैसे कमावण्याची लालसा आणि अफवांवर विश्वास — हीच सायबर गुन्हेगारांच्या यशाची गुरुकिल्ली ठरत असल्याचेही पोलिसांनी नमूद केले.
खात्री करूनच पुढे करा मेसेज
सायबर पोलिसांनी आवाहन केले आहे की, कोणताही व्हायरल मेसेज पुढे पाठवण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पाहावी. शंका असल्यास सायबर पोलिसांशी संपर्क साधावा किंवा आर्थिक फसवणुकीसंदर्भात टोल फ्री क्रमांक 1930 वर मदत घ्यावी.
“अफवांवर विश्वास ठेवू नका, न पडताळलेले मेसेज पुढे पाठवू नका. सोशल मीडियावरील खोटी माहिती फसवणुकीचे दरवाजे उघडते.”
— श्रीशैल गजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे, सोलापूर