
रायचूर कर्नाटक
“दान करण्यासाठी श्रीमंत असणे गरजेचे नाही, मनाने श्रीमंत असणे महत्त्वाचे आहे,” हे वचन खरे ठरवत रायचूरच्या ६० वर्षीय रंगम्माने आपल्या आयुष्याची कमाई मंदिरासाठी अर्पण केली. तब्बल ४० वर्षे भीक मागून जमा केलेले १.८३ लाख रुपये तिने अंजनेया मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दान केले.
गेल्या सहा वर्षांपासून तीन मोठ्या बोर्यांमध्ये साठवलेली ही रक्कम मोजण्यासाठी तब्बल २० हून अधिक लोकांना सहा तास लागले. यात सुमारे २० हजार रुपयांच्या नोटा खराब झाल्या होत्या. तरीही उरलेली १.८३ लाखांची रक्कम पाहून गावकरी थक्क झाले.
आंध्र प्रदेशातून ४० वर्षांपूर्वी बिजनगरा गावात आलेली रंगम्मा भीक मागूनच उदरनिर्वाह करत होती. यापूर्वी तिने गावकऱ्यांच्या मदतीने जमा केलेल्या १ लाख रुपयांतून स्वतःचे छोटेसे घर बांधले होते. मात्र, मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दान देणे हेच तिचे स्वप्न होते.
गावकऱ्यांनी विचारले असता रंगम्माने सांगितले, “हे दान देऊन मला खूप आनंद झाला आहे.” तिच्या या कृत्याने ती गावात “महादानवीर” म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.