
वांद्रे प्रतिनिधी
मुंबई | वांद्रे पूर्व मतदारसंघातील वाढत्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर स्थानिक आमदार वरूण सरदेसाई यांनी मुंबई पोलिसांच्या झोन ८ चे उपायुक्त डॉ. मनीष कालवानिया यांची नुकतीच भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत वांद्रे परिसरातील विविध सामाजिक आणि गुन्हेगारी विषयांचा आढावा घेण्यात आला. सरदेसाई यांनी विशेषतः ड्रग्जच्या प्रादुर्भावाचा मुद्दा उपस्थित केला. पावसाळी अधिवेशनातही त्यांनी विधानसभेत हा मुद्दा जोरदारपणे मांडला होता. त्यानंतर काही काळ पोलिसांकडून प्रभावी कारवाई झाली होती, मात्र सध्या ती कारवाई मंदावलेली दिसत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
तसेच, काही बिल्डरांच्या दबावाखाली गोरगरीब नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल झाल्याच्या तक्रारीही यावेळी मांडण्यात आल्या. या प्रकारांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून? पोलिसांनी अशा प्रकारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार सरदेसाई यांनी केली.
झोन ८ चे DCP डॉ. मनीष कालवानिया यांनी सर्व मुद्द्यांची गंभीर दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, संबंधित प्रकरणांची चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
स्थानिक स्तरावर कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आणि जनप्रतिनिधींमध्ये अशी समन्वय बैठक आवश्यक असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.