
सातारा प्रतिनिधी न्यूज नेटवर्क
ओव्हलच्या मैदानावर भारतीय क्रिकेट संघाने रविवारी इतिहास रचला. अटीतटीच्या लढतीत अवघ्या सहा धावांनी इंग्लंडचा पराभव करत केवळ कसोटी मालिका बरोबरीत सोडवली नाही, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) पॉइंट टेबलमध्येही इंग्लंडला मागे टाकलं.
लीड्सपासून सुरू झालेल्या या कसोटी मालिकेचा शेवट खऱ्या अर्थाने ‘कसोटी’ ठरला. सुरुवातीला इंग्लंडनं मालिका जिंकण्याचा सूर लावला होता, पण एजबेस्टनमध्ये भारताचा दमदार कमबॅक झाला. लॉर्ड्सवर इंग्लंड पुन्हा आघाडीत गेला, मँचेस्टर कसोटी अनिर्णित राहिली आणि अखेर ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला.
SIRAJ WILL BE REMEMBERED FOR HIS LION-HEARTED SHOW. 🦁🇮🇳 pic.twitter.com/IM4VSKd98u
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 4, 2025
पॉइंट टेबलमध्ये उलटफेर
मँचेस्टर कसोटीनंतर इंग्लंड २६ गुणांसह (५४.१७% पॉइंट पर्सेंटेज) तिसऱ्या स्थानी होता, तर भारत १६ गुणांसह (३३.३३% पॉइंट पर्सेंटेज) चौथ्या स्थानी ढकलला गेला होता. मात्र, ओव्हल कसोटीत विजय मिळवत भारताने २८ गुण (४६.६७%) मिळवत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. इंग्लंड आता २६ गुणांसह (४३.३३%) चौथ्या स्थानी घसरला आहे.
ऑस्ट्रेलिया अजूनही अव्वल
WTC पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर असून वेस्ट इंडीजविरुद्ध तिन्ही कसोटी जिंकल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर श्रीलंका आहे. सध्याचा चॅम्पियन साऊथ आफ्रिका, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांनी अद्याप मोहिम सुरू केलेली नाही.
भारताची पुढची मोहिम
भारत आता पुढील कसोटी मालिका मायदेशात वेस्ट इंडीजविरुद्ध खेळणार आहे. २ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या मालिकेनंतर भारत साऊथ आफ्रिकेला भिडणार आहे. दोन्ही मालिकांमध्ये विजय मिळवत पॉइंट टेबलमध्ये आघाडी घेण्याची सुवर्णसंधी टीम इंडियाकडे असणार आहे.
तर इंग्लंडचा संघ २१ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात पाच कसोटींच्या अॅशेस मालिकेत उतरणार आहे.