
सांगली-प्रतिनिधी
सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत महिला हवालदाराला ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. फसवणुकीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ही लाच मागितली होती. रात्रीच्या सुमारास सांगलवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सांगली पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
सांगली : सांगलीमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. महिला पोलीस लाच घेताना हाती आले आहे. सांगलीमध्ये पोलिसांना रंगेहात पकडले आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेताना विश्रामबाग पोलिस ठाण्यातील महिला हवालदार यांना पकडले आहे. अटक करण्यात आलेल्या महिला पोलीस हवालदाराचे नाव मनिषा नितीन कोंगनोळीकर उर्फ भडेकर (वय ४२, रा. शारदानगर, सांगली) असे आहे. त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले.
एका फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी व चौकशीत मदत करण्यासाठी मनिषा कोंगनोळीकर यांनी एका व्यक्तीकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारण्यासाठी मंगळवारी सांगलीवाडी येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाजवळ त्यांनी तक्रारदारास बोलावले. याबाबत संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली. त्यानुसार विभागाच्या पथकाने सांगलीवाडीत सापळा रचला होता. तक्रारदाराकडून कोंगनोळीकर यांनी पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर पथकाने त्यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी कोंगनोळीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.