
सातारा प्रतिनिधी
शिरवळ परिसरात आठ दिवसांपूर्वी घडलेल्या तरुणाच्या अपहरण प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. पोलिसांनी पाच संशयितांना गजाआड करत गुन्ह्यात वापरण्यात आलेली शस्त्रे जप्त केली आहेत.
अनिल ऊर्फ पाप्या शामराव वाडेकर, वैभव माणिकराव नवथर (दोघे रा. शिरवळ), बाळा भानुदास मंजुळे, सुनिकेत संतोष माने, पारस विश्वास भोसले (तिघे रा. सांगवी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
कर्जातून वाद, अपहरणापर्यंत थेट मामला
फिर्यादी सोमनाथ ऊर्फ माऊली शंकर राऊत (वय २५) यांनी दीड वर्षांपूर्वी संशयित वैभव नवथर याच्याकडून १० हजार रुपये उसने घेतले होते. पैसे न दिल्याचा राग मनात धरून १९ जुलै रोजी पाचही जणांनी त्याचे अपहरण केले.
फिर्यादीस जबरदस्तीने चारचाकीत बसवून शिरवळ येथील हॉस्पिटलजवळ फुलमाळा भागात हाताने व कंबरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर खंडाळा-भुईंज कारखाना मार्गे भीमनगर घाटात नेऊन पारस भोसलेने कारच्या डिकीतून तलवार काढून पोटाला लावली व शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
त्याच रात्री दीड ते अडीचच्या सुमारास भीमनगर येथील घरात ओढून नेऊन “भाई झाला का?” असे म्हणत लोखंडी गजाने मारहाण केली.
पोलिसांचा अचूक तपास
या घटनेनंतर शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. प्रथम अनिल ऊर्फ पाप्या व वैभव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीतून धागेदोरे मिळाल्याने उर्वरित तिघांनाही अटक करण्यात आली. पाचही संशयितांकडून गुन्ह्यातील साहित्य जप्त करण्यात आले आहे.
या कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर व उपविभागीय अधिकारी राहुल धस यांनी शिरवळ पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक केले.