
सातारा प्रतिनिधी
“जिथं पहिलं पाऊल टाकलं, तिथंच आज पुन्हा पाऊल ठेवताना डोळे पाणावले…” — अशा शब्दांत मंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तब्बल ५५ वर्षांनंतर ते पुन्हा आपल्या ‘मेघदूत’ बंगल्यात परतले आणि गृहप्रवेशाचा क्षण संपूर्ण देसाई कुटुंबासाठी भावनिक ठरला.
या बंगल्याचा इतिहासही तितकाच खास आहे. शंभूराज देसाईंचे आजोबा, स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर हा बंगला मिळवला होता. याच ठिकाणी मंत्री देसाईंचा जन्म झाला आणि त्यांनी आयुष्याची पहिली पाच वर्षे इथेच घालवली. त्यानंतर परिस्थितीमुळे या घरापासून त्यांना दूर रहावं लागलं.
आईसोबतचा अश्रूंनी भरलेला क्षण
गृहप्रवेशाच्या वेळी शंभूराज देसाई आईच्या कुशीत शिरले आणि क्षणभरातच डोळ्यांतून आसवं वाहू लागली. “हा फक्त घरात पाऊल ठेवण्याचा क्षण नाही, तर बालपण, कौटुंबिक वारसा आणि वडिलांच्या आठवणी पुन्हा जगण्याचा क्षण आहे,” असे त्यांनी सांगितले.
कुटुंबाचा ऐतिहासिक टप्पा
या प्रसंगी संपूर्ण देसाई कुटुंब हजर होते. अनेकांनी या क्षणाला ‘कौटुंबिक पुनर्मिलनाचा सोहळा’ असे नाव दिले. ५५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘मेघदूत’ बंगल्याचे दरवाजे पुन्हा देसाई कुटुंबासाठी उघडले आणि हा दिवस त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय ठरला.