
सातारा प्रतिनिधी
सातारा| देशात दरवर्षी कावीळसारख्या गंभीर आजारामुळे सुमारे अडीच लाख नागरिकांचा मृत्यू होतो. म्हणजेच दर ३० सेकंदाला एक बळी जातो. या पार्श्वभूमीवर जागतिक कावीळ दिनाचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालयात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. कावीळ नियंत्रणासाठी समाजाचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक असल्याचे मत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी व्यक्त केले.
जागतिक कावीळ दिन दरवर्षी २८ जुलै रोजी साजरा केला जातो. यानिमित्ताने स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयाच्या वतीने जनजागृती कार्यक्रम व रॅलीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. भारती दासवाणी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुलदेव खाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष कदम, डॉ. सुनिल चव्हाण, डॉ. निलेश कुचेकर, हेमंत भोसले यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कावीळ नियंत्रण सप्ताहात आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा कारागृहातील बंद्यांची तपासणी, गरोदर महिलांची तपासणी, आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण तसेच विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.
कावीळचे संभाव्य धोके लक्षात घेता नागरिकांनी वेळेवर तपासणी करून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.