
पुणे प्रतिनिधी
हिंजवडी आयटी हबमधून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. अवघ्या २३ वर्षांचा पियुष अशोक कवडे या आयटी अभियंत्याने कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. आज (मंगळवार) सकाळी सुमारे दहा वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पियुष कवडे हा गेल्या वर्षभरापासून हिंजवडी फेज वन येथील ॲटलस या आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होता. आज सकाळी कंपनीत नियमित मिटिंग सुरू असतानाच त्याने “छातीत दुखतंय” असं सांगत बाहेर निघण्याची परवानगी घेतली. काही क्षणांतच त्याने थेट इमारतीच्या सातव्या मजल्यावरून खाली उडी मारून आयुष्याचा शेवट केला.
घटनेची माहिती मिळताच कंपनीच्या परिसरात खळबळ उडाली असून सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्यात पोलिस प्रशासन व्यस्त असून एक सुसाईड नोट सापडली आहे. या चिठ्ठीत पियुषने लिहिले आहे — “मी आयुष्यात सगळ्या ठिकाणी अपयशी ठरलो आहे. मला माफ करा.”
या नोटीतून त्याच्या मानसिक अवस्थेचा अंदाज येतो. त्याला आलेले नैराश्य हेच आत्महत्येमागचं मुख्य कारण असावं, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
“सकाळी दहा च्या सुमारास घटना घडली आहे. पियुष अशोक कवडे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याच्याकडून सुसाईड नोट सापडली असून अधिक तपास सुरू आहे.”
– बालाजी पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हिंजवडी पोलीस स्टेशन.
या प्रकारामुळे पुन्हा एकदा आयटी क्षेत्रात मानसिक आरोग्याच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. अत्यंत उमद्या वयात जीवन संपवणारा हा तरुण मागे अनेक अनुत्तरित प्रश्न सोडून गेला आहे.