
वर्धा प्रतिनिधी
विदर्भातील कोरडवाहू भागाला बळ मिळणार आणि शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने समृद्धी नांदणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. वर्ध्यामध्ये आयोजित भाजपच्या मंथन बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी आणि दूरदृष्टीपूर्ण घोषणांची मालिका सादर केली.
“विदर्भाचा विकास हे माझं व्यक्तिगत स्वप्न आहे,” असे सांगत फडणवीसांनी या भागासाठी खास ‘नानाजी कृषी समृद्धी योजना’ आणि इतर महत्त्वाच्या निर्णयांची माहिती दिली.
१) 11 जिल्ह्यांना ‘नानाजी कृषी समृद्धी योजना’; दुष्काळ होणार भूतकाळात जमा
फडणवीसांनी जाहीर केलेल्या ‘नानाजी कृषी समृद्धी योजना’अंतर्गत विदर्भातील 11 जिल्ह्यांचा समावेश असणार असून, “हवी त्याला योजना” या तत्त्वावर ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे. कोणताही बंधनकारक निकष नसल्यामुळे लाखो शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे.
२) दरवर्षी 5 हजार कोटींची भरीव गुंतवणूक
राज्य सरकार शेतीतील गुंतवणूक वाढवण्यासाठी पुढील काही वर्षांत दरवर्षी 5 हजार कोटींची तरतूद करणार आहे. यामध्ये सिंचन, बी-बियाणे, आधुनिक शेतीतंत्रज्ञानाचा समावेश असून, उत्पादनक्षमता वाढण्याचा दावा करण्यात आला.
३) प्रत्येक शेतकऱ्याच्या दारी रस्ता
पुढील पाच वर्षांत 100 टक्के पांदण रस्त्यांचं जाळं उभं करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बावनकुळे समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात असून, त्यावर आधारित दर्जेदार रस्त्यांची उभारणी होणार आहे.
४) गावागावात सिमेंट काँक्रीट रस्ते; 18,000 कोटींची तरतूद
लोकसंख्या 1,000 पेक्षा जास्त असलेल्या प्रत्येक गावात सिमेंट काँक्रीट रस्ते बनवले जाणार आहेत. यासाठी तब्बल 18 हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, केंद्राच्या सहकार्याने कामांना गती देण्यात येणार आहे.
५) 30 लाख घरकुलांसाठी केंद्राची मंजुरी
2016 ते 2022 दरम्यान राज्यात 17 लाख घरकुलं बांधण्यात आली. आता उर्वरित 13 लाख कुटुंबांसाठीही प्रधानमंत्री आवास योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. “घरविहीन कोणतंही पात्र कुटुंब राहणार नाही,” असा शब्द फडणवीसांनी दिला.
६) सौरऊर्जेचा भक्कम आधार; वीजबिल शून्यावर
घरगुती वीजबिलाचा भार कमी करण्यासाठी 30 लाख घरांवर सोलर पॅनेल बसवण्यात येणार आहेत. तसेच, मुख्यमंत्री कृषी सौर ऊर्जा योजना डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करून शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज उपलब्ध केली जाणार आहे.
७) शाश्वत विकासाची ग्वाही
“योजनांची योग्य अंमलबजावणी झाली, तर दुष्काळ, बेरोजगारी आणि स्थलांतर हे प्रश्न इतिहासजमा होतील,” असे फडणवीसांनी स्पष्ट केले. या मास्टर प्लॅनद्वारे केवळ विदर्भ नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या घोषणांनी विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण केला आहे. आता या योजनांची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.