
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई, दि. २६ जुलै – माटुंगा परिसरात एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पसार झालेल्या दोघांना माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. ऑनलाइन जुगारात पैसे गमावल्यामुळे गुन्ह्याच्या वाटेवर वळलेल्या या दोघांकडून पोलिसांनी सोनसाखळी आणि वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे.
ही घटना १९ जुलै रोजी सायंकाळी ८.४० वाजण्याच्या सुमारास घडली. ७४ वर्षीय विजया हरिया या जैन मंदिरात दर्शन घेऊन घरी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी खेचून पळ काढला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत दोघांना बेड्या ठोकल्या.
अटक करण्यात आलेल्यांची नावे अशी आहेत –
१) मोहित अशोक संगिशेट्टी (२२), राहणार कुर्ला (प.)
२) रोहित ओमसिंग गौंड (१९), राहणार कुर्ला (प.)
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ९.८० ग्रॅम वजनाची, सुमारे ९० हजार रुपये किमतीची सोनसाखळी आणि सुमारे दीड लाख रुपये किमतीची केटीएम ड्यूक मोटारसायकल (एमएच-०३-डीटी-३६२५) जप्त केली आहे. एकूण हस्तगत मालमत्तेची किंमत अंदाजे २.४० लाख रुपये आहे.
ही यशस्वी कारवाई पोलिस आयुक्त देवेन्द्र भारती, सहआयुक्त सत्यनारायण, अपर आयुक्त विक्रम देशमाने, उपआयुक्त रागसुधा आर., सहाय्यक आयुक्त योगेश गावडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील आणि त्यांच्या पथकातील पोलीस शिपाई जुवाटकर, देशमाने, बहादुरे, तोडासे, मेटकर आणि सोनवलकर यांनी ही कारवाई केली.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोउनि सुनील पाटील करत आहेत.