
नवी मुंबई प्रतिनिधी
“तंत्रमंत्राने तुमचे पैसे डबल करून देतो” असे आमिष दाखवत २० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघा ठगांना सीबीडी बेलापूर पोलिसांनी अवघ्या १८ तासांच्या आत अटक केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी १९ लाख रुपये रोख आणि १ लाख रुपये किमतीची महागडी स्कुटी असा एकूण २० लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
फसवणुकीचा प्रकार सीबीडी बेलापूर परिसरात घडला. मिरा रोड येथील राहिवासी असलेल्या तक्रारदाराला “विशेष तांत्रिक पूजा विधी करून पैसे डबल करू” असे सांगत आरोपींनी सीबीडीमध्ये एक विधी आयोजित केला. या विधीच्या बहाण्याने तक्रारदाराकडून २० लाख रुपये रोख रक्कम देव्हाऱ्यात ठेवायला लावून, विधीत गुंतवून ठेवत आरोपींनी बॅगेतील पैसे घेऊन घटनास्थळावरून चक्क पलायन केले.
तक्रारीनंतर सीबीडी पोलिसांनी तत्काळ तपास सुरु करत सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गुप्त बातम्यांच्या आधारे आरोपींचा माग काढला आणि केवळ १८ तासांत या फसवणुकीचा छडा लावत त्यांना अटक केली.
अटक करण्यात आलेले आरोपी सचिन भरत शर्मा उर्फ प्रेमसिंग साधू महाराज (वय ३५) आणि जयदीप दिनेश पामेचा (वय २५) हे आहेत. त्यांच्याकडून १९ लाख १ हजार रुपयांची रोख रक्कम आणि MH-46-CT-0679 क्रमांकाची सुझुकी बर्जमन स्कुटी पोलिसांनी जप्त केली आहे.
या प्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३०९/२०२५ नुसार भारतीय दंड संहितेच्या कलम ३१८(४), १२७(२), ३(५) तसेच महाराष्ट्र नरबळी व अनिष्ट प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ अंतर्गत कलम ३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदेश रेवले आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
तक्रारदाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान वाचवण्यात पोलिसांना यश आले असून, या फसवणुकीच्या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.