
सातारा प्रतिनिधी
महाराष्ट्रात कायद्याची भीती राहिली नाही का? हे राज्य बिहारच्या वाटेवर तर नाही ना? असा सवाल सध्या संपूर्ण राज्यात विचारला जात आहे. कारण, साताऱ्यात एका एकतर्फी प्रेमात वेडलेल्या तरुणाने शाळेत जाणाऱ्या एका निष्पाप अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चक्क चाकू लावला! संपूर्ण परिसर हादरवणारा हा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या घटनेने पोलिस व्यवस्थेपासून सामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांना हादरवून टाकलंय.
एकतर्फी प्रेमात वेडावलेला ‘मजनू’, मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवून दहशत माजवली!
महाराष्ट्रातील सातारा शहरातील ही धक्कादायक घटना, एकतर्फी प्रेम करणाऱ्या मजनुने अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर चाकू लावला, पहा थरारक व्हिडिओ,.. महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय! @CMOMaharashtra pic.twitter.com/7HXcW909oa
— Pratap Awachar – प्रताप अवचार (@pratapbhagawata) July 21, 2025
ही धक्कादायक घटना सातारा शहरातील मोळाचा ओढा परिसरात घडली. आरोपी आर्यन वाघमळे (वय 18, मूळगाव – आरळे) याने शाळकरी मुलीला भरदिवसा गाठत तिच्या गळ्याला चाकू लावून ठार मारण्याची धमकी दिली. संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र माथेफिरू तरुणाने कोणाचेही ऐकले नाही. उलट, त्याने सर्वांना धमकावत परिसरात थरकाप उडवून दिला.
‘वाचवा-वाचवा’ म्हणणाऱ्या मुलीला सोडवायला आले देवदूत – उमेश आडगळे!
या जीवघेण्या प्रसंगात सर्वसामान्य नागरिक भयभीत होत मागे सरकत असताना, उमेश आडगळे या धाडसी तरुणाने कोणतीही पर्वा न करता आपल्या जिवाची पर्वा न करता पुढे झेप घेतली. झटकन भिंतीच्या कठड्यावरून आतमध्ये उतरून त्याने आरोपीच्या हातातील चाकू हिसकावून घेतला आणि मुलीला मोकळं केलं. या झटापटीत मुलीच्या गळ्याला किरकोळ जखम झाली असली, तरी उमेशच्या धाडसामुळे तिचा जीव वाचला. आज संपूर्ण सातारा शहर उमेश आडगळेच्या शौर्याचे कौतुक करत आहे.
आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल – पोक्सो, आर्म ॲक्टसह विविध कलमांतर्गत कारवाई
सुरुवातीला आरोपी अल्पवयीन असल्याचा संशय होता. मात्र, तो 18 वर्षांचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पोक्सो कायदा, विनयभंग, जाणीवपूर्वक इजा करणे, आणि आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, त्याचा मनोविकार तपासण्यासाठी वैद्यकीय चाचण्या करण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात महिलांची सुरक्षितता धोक्यात?
ही घटना ही केवळ एक अपवाद नाही, तर समाजात वाढत चाललेल्या विकृत मानसिकतेचं आणि कायद्याची भीती हरवू लागल्याचं गंभीर लक्षण आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत सरकार गंभीर आहे का? कायदा आणि सुव्यवस्थेच्या गप्पा करणाऱ्यांनी आता कृतीतून उत्तर द्यायला हवं, अशी मागणी नागरिक करत आहेत.
उमेश आडगळे यांचा सन्मान व्हावा!
महाराष्ट्र सरकारने त्याच्या धाडसाला मान्यता देत ‘वीरता पुरस्कार’ देण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरतेय!
ही घटना राज्याच्या अंतर्मनाला हादरवणारी आहे. आता तरी पोलिस प्रशासन आणि राज्यकर्त्यांनी जागं व्हावं आणि असे प्रकार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.