
नागपूर प्रतिनिधी
राज्यातील पोलीस दलासाठी मोठी आणि बहुप्रतिक्षित आनंदवार्ता! अखेर २०१३ साली पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी घेतलेल्या अर्हता परीक्षेत यश मिळवलेल्या १८८ हवालदारांना पदोन्नती मिळाली आहे. गृह विभागाने महसुली संवर्ग मागवत हा निर्णय घेतला असून, येत्या काही आठवड्यांत संबंधित कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर दोन ‘स्टार’ झळकणार आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष, कर्मचाऱ्यांचा हिरमोड
२०१३ साली झालेल्या PSI परीक्षेत राज्यभरातून जवळपास ५ हजार पोलीस कर्मचारी उत्तीर्ण झाले होते. मात्र, त्यापैकी बहुतांश जण अद्यापही पदोन्नतीच्या प्रतिक्षेतच आहेत. काही कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर उभे असतानाही अधिकारी पद हुलकावणी देत होते. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून या प्रक्रियेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचा मोठा हिरमोड झाला होता.
पोलीस दलात अधिकाऱ्यांची वानवा
सध्या राज्य पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक ते सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या जवळपास ४ हजार पदे रिक्त आहेत. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था राखणे आणि गुन्ह्यांचा तपास यावर ताण निर्माण झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे ‘API ते PI’ पदोन्नती प्रक्रिया देखील रखडली आहे.
आणखी ५ हजार जण पदोन्नतीच्या प्रतीक्षेत
२०१३ च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उर्वरित ४ ते ५ हजार कर्मचाऱ्यांचे काय? हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. अनेकजण आपल्या कार्यकाळात अधिकारी होण्याची अपेक्षा ठेवून आहेत. त्यामुळे पोलीस महासंचालकांनी तातडीने पुढचे पाऊल उचलून उर्वरित कर्मचाऱ्यांचीही पदोन्नती निश्चित करावी, अशी जोरदार मागणी पोलीस दलातून होत आहे.
तीन दिवसांपूर्वी पोलीस महासंचालक कार्यालयाने १८८ कर्मचाऱ्यांचा महसुली संवर्ग गृह विभागाकडे सादर केला. आता लवकरच या कर्मचाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.
राज्य पोलीस दलातील या निर्णयामुळे संपूर्ण विभागात आनंदाचे वातावरण असून, “सरतेशेवटी आमच्या मेहनतीला मान्यता मिळाली,” अशा प्रतिक्रिया पोलीस कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. आता उर्वरित कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबतही लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे.