पुणे प्रतिनिधी
शहरातील वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या एका पोलिस हवालदाराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी गावाला गेल्याने घरी एकटे असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती असून, ही बाब समोर येताच संपूर्ण पुणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
मृत हवालदाराचे नाव राजेंद्र विलास गायकवाड (वय ४२) असे असून, ते पुणे शहर वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात कार्यरत होते. शनिवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने ते घरीच होते. दरम्यान, त्यांची पत्नी काही कामानिमित्त दौंड येथे गेल्या होत्या, तर त्यांचा १२ वर्षांचा मुलगा आणि १४ वर्षांची मुलगी शाळेत गेले होते.
सकाळपासून गायकवाड हे पत्नीला सातत्याने फोन करत होते, मात्र त्यांच्या कॉलला प्रतिसाद मिळाला नव्हता. दुपारी मुलं शाळेतून परतल्यानंतर घर बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलांनी बराच वेळ दार ठोठावले, पण आतून काही प्रतिसाद न आल्याने त्यांनी शेजाऱ्यांकडे धाव घेतली.
शेजाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घराचं दार उघडलं असता गायकवाड यांनी घरात गळफास घेतल्याचं दिसून आलं. ही माहिती मिळताच त्यांची पत्नी तातडीने पुण्याकडे रवाना झाली. दरम्यान, विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
गायकवाड यांच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट झालेलं नसून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलीस दलातही मोठी खळबळ उडाली आहे.


