
मुंबई प्रतिनिधी
देशभरात कोट्यवधी लोक रोज वापरत असलेली UPI सेवा आता आणखी शिस्तबद्ध होणार आहे. नेशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने जाहीर केलेल्या नव्या नियमांमुळे, 1 ऑगस्ट 2025 पासून तुमच्या PhonePe, Google Pay, Paytm अशा अॅप्सवरील व्यवहारांच्या पद्धतीत मोठा बदल होणार आहे. हे नियम केवळ तांत्रिक नसून, सर्वसामान्य वापरकर्त्यांच्या दैनंदिन व्यवहारावर थेट परिणाम करणारे आहेत.
काय असणार आहे ‘नवीन UPI नियम’?
NPCI ने नवी API गाईडलाईन्स जारी केल्या असून, त्या अंतर्गत खालील महत्त्वाचे बदल होणार आहेत:
१) दिवसातून फक्त 50 वेळाच बॅलन्स चेक
UPI अॅपद्वारे खाते शिल्लक पाहण्यासाठी (Balance Check) आता दिवसात जास्तीतजास्त ५० वेळांचीच परवानगी असेल. बँक सर्व्हरवरील लोड कमी करण्यासाठी ही मर्यादा लागू करण्यात आली आहे.
२) लिंक्ड बँक खात्यांची तपासणी 25 वेळांपुरतीच
ज्या मोबाईल नंबरशी बँक खाती लिंक आहेत, ती माहिती UPI अॅप्सना दिवसात फक्त २५ वेळाच मागवता येणार आहे. यामुळे सतत होणाऱ्या API वापरावर अंकुश बसेल.
३) ऑटो-डेबिट व्यवहारासाठी ठराविक वेळा
Netflix, SIP, Amazon सारख्या ऑटो-पेमेंट व्यवहारांसाठी आता तीनच वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत:
• सकाळी 10 वाजेपर्यंत
• दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत
• रात्री 9:30 नंतर
यामुळे सर्व्हर लोड ‘पिक अवर्स’मध्ये कमी होणार आहे.
४) फेल झालेल्या व्यवहाराचे स्टेटस केवळ 3 वेळाच
जर तुमचा UPI व्यवहार अयशस्वी झाला, तर त्याचा स्टेटस दिवसात फक्त 3 वेळाच तपासता येणार. आणि प्रत्येक वेळेस 90 सेकंदाचं अंतर ठेवणं बंधनकारक असेल.
५)आधीच खातेदाराचे नाव दिसणार
30 जून 2025 पासून, कोणालाही पैसे पाठवण्याआधी त्याचे बँकेत नोंदलेले नाव UPI अॅपवर दिसेल. यामुळे चुकीच्या व्यक्तीकडे पैसे जाण्याचा धोका लक्षणीय कमी झाला आहे.
६) ‘चार्जबॅक’ प्रक्रियेवरही मर्यादा
चार्जबॅक म्हणजे ऑनलाइन व्यवहारात फसवणूक किंवा चूक झाल्यास पैसे परत मिळवण्याची प्रक्रिया.
NPCIच्या नव्या नियमानुसार,
• 30 दिवसांत केवळ 10 वेळा चार्जबॅक करता येणार,
• एका व्यक्ती किंवा कंपनीसाठी ही मर्यादा फक्त 5 वेळांची असेल.
हा बदल डिसेंबर 2024 पासूनच लागू झाला आहे.
व्यवहारांचा वेग अधिक झपाट्याने
NPCI ने जून 2025 मध्येच API रिस्पॉन्स टाइम अधिक जलद केला आहे:
यशस्वी व्यवहारासाठी – 15 सेकंदात प्रक्रिया पूर्ण
• अयशस्वी व्यवहारासाठी – 10 सेकंदात फीडबॅक
७) नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
1 ऑगस्टपासून हे सर्व नियम अंमलात येणार असल्याने, UPI व्यवहार करताना नव्या अटींची माहिती ठेवणं अत्यावश्यक आहे. अन्यथा बँक व्यवहारात अडथळे येऊ शकतात, सेवा अकार्यक्षम होण्याचा धोका आहे.
UPI व्यवहार अधिक सुरक्षित आणि सुलभ होण्यासाठीचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. पण, या नव्या नियमानुसार व्यवहार करताना सतर्कता हीच सर्वात मोठी सावधगिरी ठरणार आहे.