
पुणे प्रतिनिधी
बुधवार पेठेतील बाजीराव रस्त्यावर असलेल्या नामांकित सराफा दुकानात साडेचार लाख रुपयांचे दागिने चोरून नेणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा चोरटा कोणताही सराईत गुन्हेगार नसून इंजिनिअरिंगचा टॉपर असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. केवळ दुचाकी घेण्यासाठी आणि आर्थिक अडचणीमुळे त्याने ही धाडसी चोरी केल्याचे समोर आले आहे.
६ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली होती. विश्रामबाग पोलिसांनी तांत्रिक तपास आणि तब्बल २३० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. शेवटी कोलार (कर्नाटक) येथून सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.
दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून प्रवेश, साडेचार लाखांचे दागिने लंपास
फिर्यादी रितेश रतनलाल पिचा (वय ४४, रा. मार्केटयार्ड) यांच्या ‘आर. जे. ज्वेलर्स’ या दुकानात ही चोरी झाली. चोरट्याने दुसऱ्या मजल्यावरील शौचालयाच्या खिडकीतून आत प्रवेश केला व सोन्याचे दागिने चोरून पसार झाला.
कर्नाटकमध्ये सापळा रचून अटक
विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पथक आरोपीचा माग काढत कोलार जिल्ह्यात पोहोचले. गांधीनगर येथे सापळा रचून आरोपी लिखीत जी (वय १९, रा. जंगमगुर्जनहल्ली, कोलार) याला अटक केली. त्याच्याकडून चोरीचे सर्व दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजचे ओळखपत्र, मोबाईल फोन आणि चोरीसंदर्भातील पुरावे मिळाले. मोबाईलमध्ये दागिन्यांचे फोटो तसेच हाताला झालेल्या जखमेचे फोटो सापडले.
चार दिवसांची गुप्त पाळत, मग अटक
आरोपी सुरुवातीला घरी सापडला नाही. मात्र पोलिसांनी त्याच्या हालचालींवर गुप्त पाळत ठेवली. चार दिवसांच्या सखोल निरीक्षणानंतर गांधीनगर येथे त्याला अटक करण्यात यश आले.
इंजिनिअरिंगचा टॉपर, पण आर्थिक संकटात
चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिली असून, तो कोणताही सराईत गुन्हेगार नसल्याची माहिती मिळाली. इंजिनिअरिंगमध्ये टॉपर असूनही आर्थिक अडचणीत सापडल्याने आणि दुचाकी घेण्यासाठी त्याने चोरी केल्याचे कबूल केले आहे.
पोलीस आयुक्तांकडून विशेष पथकाची प्रशंसा
या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त संजय बनसोडे, उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे, निरीक्षक अरुण घोडके, सहाय्यक निरीक्षक राजेश उसगावकर, पोलीस अंमलदार सचिन कदम, गणेश काठे, अमोल भोसले, शैलेश सुर्वे यांचा तपासात मोलाचा वाटा राहिला.