
पंढरपूर | प्रतिनिधी
‘भक्तांवरील अपार श्रद्धा आणि विठ्ठलभक्तीचा महासागर’ याचं प्रत्यक्ष दर्शन म्हणजे आषाढी वारी. यंदाच्या आषाढी यात्रेत लाडक्या विठोबाच्या चरणी तब्बल १० कोटी ८४ लाख ८ हजार ५३१ रुपयांचे दान अर्पण करण्यात आले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा २ कोटी ३५ लाख ४९ हजार ९७१ रुपयांनी अधिक रक्कम जमा झाली आहे. ही भरभरून आलेली भक्तीची देणगी ‘गरिबांचा देव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलाच्या मंदिरात नोंद झाली असून, भक्तांच्या श्रध्देची हीच साक्ष देणारी ठरली आहे.
भाविकांचा ओघ, विठोबाच्या चरणी अर्पण
यात्रेच्या कालावधीत – आषाढ शुद्ध प्रतिपदा (२६ जून) ते आषाढ शुद्ध १५ (१० जुलै) – पंढरपुरात भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. मंदिर समितीच्या जलददर्शन व नियोजनामुळे अनेकांनी विठ्ठलाच्या दर्शनाचा लाभ घेतला. दर्शनानंतर हजारो भाविकांनी मनःपूर्वक दान अर्पण केलं.
कुठून किती दान?
देणगीचा प्रकार रक्कम (रु.)
* श्रींच्या चरणी अर्पण ७५,०५,२९१
* हुंडीपेटी १,४४,७१,३४८
* देणग्या २,८८,३३,५६९
* लाडू प्रसाद विक्री ९४,०४ ३४०
* भक्तनिवास ४५,४१,४५८
* परिवार देवता३२,४५,६८२
* सोने-चांदी अर्पण२,५९,६१,७६
* अगरबत्ती, चंदन, फोटो, लॉकर, इ.१२,४५,०७५
* इलेक्ट्रिक रिक्षा / बस३२,००,०००
मंदिर समितीचा संकल्प
या वाढीव दानातून वारकऱ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा, स्वच्छता व दर्शन व्यवस्थेत अधिक सुधारणा करण्याचा संकल्प मंदिर समितीने केला आहे. समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री म्हणाले, “वारकऱ्यांच्या सेवेत आम्ही कोणतीही कसर ठेवणार नाही. मिळालेल्या दानाचा सदुपयोग भाविकांसाठीच केला जाणार आहे.”
श्रद्धा आणि समर्पणाचं प्रतीक
वारकऱ्यांचं विठोबावरचं प्रेम आणि त्यांची श्रद्धा दरवर्षी अधिक दृढ होताना दिसत आहे. ‘दान’ हा केवळ पैशांचा विषय नसून, तो भक्तीचा आविष्कार असल्याचं यावर्षीच्या दानरकमेवरून स्पष्ट होते.